नवी दिल्ली : महागाईसंदर्भातील ताज्या आकडेवारीवर आक्षेप घेत काँग्रेसने आरोप शुक्रवारी आरोप केला, की जीवनावश्यक वस्तूंच्या घसरलेल्या किमतींचा फक्त घाऊक विक्रेते आणि सरकारला ‘लाभ’ होत आहे. त्याचा ग्राहकांना कोणताही लाभ मिळत नाही.
मे महिन्यात घाऊक दर निर्देशांकांवर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर शून्याच्या खाली गेल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला, की जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल न झाल्याने सरकार महागाई कमी झाल्याबाबत खोटे बोलत आहे. महागाई कमी झाल्याचा सर्वसामान्य ग्राहकांऐवजी सरकारला दिलासा मिळत आहे आणि त्याचा खरा फायदा घाऊक विक्रेत्यांना होत आहे. सरकारने याबाबत मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नये. किरकोळ बाजारात जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोलसारख्या इंधनांचे दर का खाली येत नाहीत याचे आश्चर्य वाटते. हे ‘सुटा-बुटाचे सरकार’ केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का?
अन्नपदार्थ, इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या घटलेल्या किमतींमुळे घाऊक दर निर्देशांकावर आधारित महागाई मे महिन्यात उणे ३.४८ टक्क्यांवर आली. हा गेल्या साडेसात वर्षांतील नीचांक होता. या सलग दुसऱ्या महिन्यात जेव्हा घाऊक दर निर्देशांकावर आधारित महागाई शून्याखाली राहिली आहे. यापूर्वी एप्रिलमध्येही ती उणे ०.९२ टक्के होती. एक वर्षांपूर्वी मे २०२२ मध्ये घाऊक महागाई १६.६३ टक्के होती. गौरव वल्लभ यांनी सांगितले, की गेले काही दिवस भाजप सरकार महागाई दराबाबत खोटा प्रचार करत आहे. घाऊक दर निर्देशांकासह किरकोळ दर निर्देशांकही खाली आल्याने देशाला महागाईपासून दिलासा मिळाला, असा दावा भाजप करत आहे. मात्र, एकाही जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत घट झाली नाही, हे वास्तव आहे. मे २०२२ ते मे २०२३ पर्यंत घाऊक बाजारात खनिज तेलाचे दर २७ टक्क्यांनी कमी झाले असताना, पेट्रोल-डिझेलच्या सर्वसामान्य ग्राहकांना एक पैशाचाही फायदा का दिला जात नाही? घाऊक बाजारात भाजीपाला, बटाटे, तेलबियांचे दर अनुक्रमे २०.१२ टक्के, १८.७ टक्के, १५.६ टक्क्यांनी कमी होत आहेत, मग त्याच तेलबियांपासून बनवलेले तेल सर्वसामान्यांना ३.१५ टक्के महाग का विकले जाते? यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे का? सरकारची कोणती हतबलता आहे? असा सवालही गौरव वल्लभ यांनी विचारला.