अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना काँग्रेसच्या काळातील अर्थव्यवस्थेबाबतची श्वेतपत्रिका काढली जाईल, असे सुतोवाच केले होते. त्याला उत्तर म्हणून आज काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात काळी पत्रिका काढली गेली. यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी सरकार हे लोकशाहीसाठी एक धोका असून त्यांनी बेरोजगारी, महागाई अशा विषयांवर दुर्लक्ष केले. तसेच मागच्या दशकभरात भाजपातेर राज्यांशी भेदभाव केला, असा आरोप काँग्रेसने केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१० वर्ष अन्याय काळ

मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काळी पत्रिका प्रसिद्ध केली. यावेळी ते म्हणाले, “मोदी सरकारची १० वर्ष हा अन्याय काळ होता. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळताना हे सरकार सपशेल अपयशी ठरले.” अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१४ पूर्वीच्या अर्थव्यवस्थेवर आणि गैरव्यवहारांवर श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने ही काळी पत्रिका काढण्याचा निर्णय घेतला.

Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार; म्हणाले, “त्या दिवशी ते लोकशाहीसाठी संसदेत आले होते!”

भाजपाने १० वर्षांत ४११ आमदार आयात केले

खरगे म्हणाले की, आम्ही बेरोजगारीचा विषय मांडला. त्याबद्दल भाजपा काहीही बोलत नाही. केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा या बिगर भाजपा सरकार असलेल्या राज्यांवर केंद्राकडून अन्याय केला जात आहे. भाजपाच्या राज्यात लोकशाही संपविण्याचा प्रयत्न होत आहे. मागच्या १० वर्षांत भाजपाने इतर पक्षातून ४११ आमदार आयात केले आहेत. अनेक राज्यातील काँग्रेस सरकार उलथवून भाजपाने स्वतःचे सरकार स्थापन केले, असाही आरोप खरगे यांनी केला.

Video: “निव्वळ लाजिरवाणं”, मोदींनी राज्यसभेत मनमोहन सिंग यांचं कौतुक केलेल्या कृतीवर भाजपानं केली होती टीका; वाचा नेमकं काय घडलं होतं तेव्हा!

पंतप्रधान मोदींनी उडविली काळ्या पत्रिकेची खिल्ली

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मल्लिकार्जून खरगे यांनी काळी पत्रिका जाहीर केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करत असताना या काळ्या पत्रिकेची खिल्ली उडविली. “आपल्याकडे लहान मुलाला नजर लागू नये, म्हणून कुटुंबातून एक छोटासा काळा टिका लावला जातो. मागच्या १० वर्षांत भारत प्रगतीच्या शिखरावर आहे. या प्रगतीला कुणाची नजर लागू नये, म्हणून काळा टिका लावण्याचा प्रयत्न झाला. मी त्यासाठी खरगे यांचे आभार व्यक्त करतो. कारण आमच्या प्रगतीसाठी त्यांनी काळा टिका लावला, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. एका बुजूर्ग व्यक्तीने हे काम केलं, त्याचा अधिक आनंद होत आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress releases black paper against modi govt pm modi took a swipe kvg