काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. राहुल गांधी आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू करणार आहेत. मणिपूर ते मुंबई अशी ही पदयात्रा असणार असून या यात्रेला ‘भारत न्याय यात्रा’ असं नाव देण्यात आलं होतं. ही पदयात्रा ईशान्येतील मणिपूरपासून सुरू होऊन देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे मुंबईत जाणार आहे. दरम्यान, या यात्रेच्या नावात थोडा बदल करण्यात आला आहे. या पदयात्रेला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असं नाव देण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या यात्रेबाबतची माहिती जाहीर केली.
जयराम रमेश म्हणाले, ही यात्रा १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मणिपूरची राजधानी इम्फाळमधून सुरू होईल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. राहुल गांधी या यात्रेदरम्यान सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायावर त्यांची मतं मांडतील आणि देशातली परिस्थिती जाणून घेतील.
तब्बल ६,७०० किमी लांब अशी ही पदयात्रा देशातल्या १५ राज्यांमधून जाईल. काँग्रेसने त्यांच्या सर्व मित्रपक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी तब्बल ६७ दिवस ६,७१३ किमी प्रवास करतील. १५ राज्यांच्या ११० जिल्ह्यांमधून ही यात्रा जाईल. या यात्रेत तब्बल १०० लोकसभा मतदारसंघांना ते भेट देतील. ही यात्रा मुबईत समाप्त होईल. याआधीच्या भारत जोडो यात्रेत पाच महिन्यांच्या कालावधीत राहुल गांधी यांनी एकूण १२ राज्यांमधील ७५ जिल्ह्यांतून प्रवास केला होता.
राहुल गांधी यांची याआधीची भारत जोडो यात्रा कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधून गेली होती. या राज्यांत नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसला या पदयात्रेचा फायदा झाला. परंतु, राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. आता राहुल गांधींची यात्रा ईशान्य भारतातून सुरू होणार असून यात्रेचा मधला मोठा भाग हा हिंदी पट्ट्यातील राज्यांमधला असणार आहे. राहुल गांधी त्यांच्या यात्रेच्या ६७०० किमीपैकी ११०० किमी प्रवास एकट्या उत्तर प्रदेशमध्ये करणार आहेत.
हे ही वाचा >> “आम्ही ममता बॅनर्जींकडे भीक मागितली नाही”, अधीर रंजन चौधरींचं वक्तव्य, ‘इंडिया’तील वाद चव्हाट्यावर?
राहुल गांधी या पदयात्रेदरम्यान, मणिपूर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उडिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा १५ राज्यांचा प्रवास करणार आहेत.