रविवारी कर्नाटकमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणावर टीका केली होती. भारत सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारताच्या लोकशाहीची मुळे आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासाने जोपासली गेली आहेत. मात्र, लंडनमध्ये याच भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला काँग्रेस नेते पवन खेरा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ”नरेंद्र मोदीजी तुम्ही केवळ पंतप्रधान आहात, देव नाही”, असं ते म्हणाले. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – भारतातील लोकशाहीवर शंका हा देशाचाच अवमान; पंतप्रधान मोदी यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका
काय म्हणाले पवन खेरा?
पंतप्रधान मोदी जेव्हा म्हणतात, की काँग्रेसने ७० वर्षात काहीच केलं नाही, तेव्हा ते तीन पिढ्यांचा अपमान करता. बीबीसीवर छापे टाकताना त्यांना देशाच्या प्रतिमेची काळजी नव्हती. दक्षिण कोरियात बोलताना, ‘भारतात जन्म घेणं दुर्देवी आहे’, असं ते म्हणाले होते. तेव्हा त्यांना भारताच्या लोकशाही बद्दल आदर नव्हता का? अशी प्रतिक्रिया पवन खेरा यांनी दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांना स्वत:बद्दल काही गैरसमज आहेत. ते स्वत:ला देव समजतात, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं, की ते फक्त या देशाचे पंतप्रधान आहेत, देव नाहीत, असेही ते म्हणाले.
केंब्रिजमधील विद्यार्थ्यांसमोर भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानांवर चर्चा केली, तर त्यात चुकीचं काय? तुमच्या धोरणांवर केलेली टीका, ही देशावर केलेली टीका कधीपासून व्हायला लागली? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
हेही वाचा – VIDEO : “काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त, पण…”, कर्नाटकातून पंतप्रधानांचा हल्लाबोल
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?
धारवाड येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) संकुलाचे उद्घाटन केल्यानंतर एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्या अप्रत्यक्ष टीका केली होती. “ज्या लंडनमध्ये बसवेश्वरांचा पुतळा आहे, त्याच लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या लोकशाहीची मुळे शतकानुशतके जपली गेली आहेत. जोपासली गेली आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांना हानी पोहोचवू शकत नाही. असे असतानाही काही व्यक्ती सातत्याने त्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. अशा व्यक्ती बसवेश्वरांचा, कर्नाटकवासीयांचा, भारताच्या महान परंपरांचा, भारतातील १३० कोटी सजग नागरिकांचा अपमान करत आहेत. कर्नाटकच्या जनतेने अशा लोकांपासून सावध राहावे”, असे ते म्हणाले होते.