प्रस्थापित सत्तेच्या विरोधातील लाटेवर स्वार होत आणि ज्येष्ठ नेते वीरभद्रसिंह यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप निष्फळ ठरवत काँग्रेसने गुरुवारी हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाकडून सत्ता हिसकावून घेतली. ६८ सदस्यांच्या विधानसभेत या पक्षाला ३६ जागांवरील विजयामुळे काठावरचे बहुमत मिळाले. गेल्या निवडणुकीत या पक्षाला २३ जागा मिळाल्या होत्या.
सत्तेवर असलेल्या पक्षाला नाकारण्याची परंपरा राज्याने या निवडणुकीतही पाळली. सत्ताधारी भाजपला अंतर्गत भांडणे आणि बंडखोरी यांचा फटका बसला. भाजपला अवघ्या २६ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत या पक्षाला ४१ जागांवर विजय मिळाला होता.  बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले पाच उमेदवार यशस्वी ठरले.
राज्याचे पाच वेळा मुख्यमंत्री झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्रसिंह यांनी सिमला ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळविला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यातील पक्षाच्या प्रचाराची धुरा त्यांनीच सांभाळली होती. त्यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री पी. के. धुमल हमीरपूरमधून विजयी झाले, मात्र त्यांचे चार सहकारी मंत्री पराभूत झाले. काँग्रेसने भाजपकडून २२ जागा हिसकावल्या, तर सत्ताधारी भाजपला काँग्रेसच्या ताब्यातील फक्त सात जागाच खेचता आल्या.    
पक्ष बलाबल
एकूण जागा – ६८
घोषित जागा – ६८
काँग्रेस – ३६
भारतीय जनता पक्ष- २६
हिमाचल लोकहित पक्ष – १
अपक्ष – ५    

Story img Loader