राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण झाला असून पुन्हा एकदा राज्य सरकार संकटात अकडलं आहे. अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याच्या तयारीत असताना, सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा मात्र याला विरोध असून ८२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या सत्तासंघर्षावर तोडगा काढण्यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरु असताना सचिन पायलट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन पायलट यांनी आपण जयपूरमध्ये असून, दिल्लीत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हायकमांडच निर्णय घेईल असंही सांगितलं आहे. ते म्हणाले “मी जयपूरमध्ये असून सध्या तरी दिल्लीला जाणार नाही. हायकमांडला त्यांचा निर्णय घेऊ दे, त्यानंतर मी माझा निर्णय घेईन”.
राजस्थानमधील राजकीय स्थितीवर तोडगा काढण्यासाठी सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जून खर्गे आणि अजय माकन यांना पाठवलं असून, सविस्तर अहवाल देण्यास सांगतिलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांना अशोक गेहलोत यांचा पाठिंबा असल्याचं मल्लिकार्जून खर्गे यांचं म्हणणं असल्याचं वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
अजय माकन संतापले
दरम्यान, आमदारांशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले काँग्रेसचे निरीक्षक अजय माकन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी जाहीर केली आहे. ते म्हणाले “प्राथमिकदृष्ट्या ही अनुशासनहीनता सुरु आहे. आम्ही बैठक बोलावलेली असताना त्याच वेळी आणखी एक बैठक बोलावण्यात आली. ते सर्व आमदार आहेत. कोणी राजीनामा दिला आहे हे त्यांनाच माहिती नाही. काँग्रेस अध्यक्ष यावर निर्णय घेतील. त्यांनी काही मागण्या ठेवल्या असून आम्ही त्या मान्य करणार नाही. आम्ही आमदारांची वाट पाहिली, पण ते आले नाहीत. आता आम्ही आमचा अहवाल नेतृत्वाकडे सादर करु”.
भाजपाकडून टीका
भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं असून ‘भारत जोडो’ यात्रेमुळे कमी मनोरंजन झाल्याने आता राजस्थानमध्ये सुरु झाल्याचा टोला लगावला आहे. या संघर्षातून काँग्रेसमध्ये फक्त सत्तेची हाव असून, जनतेची सेवा करण्याची इच्छा नाही हे दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसकडे ना दिशा आहे, ना नेता असंही ते म्हणाले आहेत.