काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी खासदार राहुल गांधींची तुलना थेट प्रभू श्रीराम यांच्याशी केल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशभर दौरा करत असून त्याअनुषंगाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी भाजपाकडून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर वेळोवेळी टीका करण्यात आली आहे. त्यातच आज काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींची तुलना थेट प्रभू श्रीराम यांच्याशी केल्यानंतर त्यावरून राजकारण सुरू झालं आहे. सलमान खुर्शिद यांच्या या वक्तव्यावरून आता भाजपानं खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते सलमान खुर्शिद?
सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक करताना राहुल गांधी हे एखाद्या योगीप्रमाणे तपस्या करत असल्याचं विधान केलं होतं. “राहुल गांधी हे सुपर ह्युमन आहेत. आपण एवढे जॅकेट्स घालूनही थंडीने कुडकुडत आहोत. पण राहुल गांधी भारत जोडो यात्रेसाठी टीशर्टवर फिरत आहेत. राहुल गांधी हे पूर्ण लक्ष केंद्रीत करून तपस्या करणाऱ्या योगींप्रमाणे आहेत”, असं सलमान खुर्शिद म्हणाले. तसेच, “प्रभू श्रीराम यांच्या खडावा (पादत्राणे) घेऊन भरत आधी पुढे पोहोचत असत. आम्हीही त्यांच्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये पादत्राणं पोहोचवली आहेत. आता रामजी (राहुल गांधी)ही येतील”, असंही सलमान खुर्शिद म्हणाले आहेत.
दरम्यान, सलमान खुर्शिद यांच्या वक्तव्याचा भाजपानं खोचक शब्दांत समाचार घेतला आहे. भाजपा नेते दुश्यंत गौतम यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “ते जर रामाचे अवतार होते, तर रामाची सेनाही त्यांच्यासोबत होती. यांची सेना कपडे काढून का नाही फिरत मग? यांनाही रामाच्याच सेनेप्रमाणे कपडे काढून फिरायला हवं. मला तर वाटतं की राहुल गांधींनी त्यांच्या सेनेला सांगायला हवं की ते असं काय घेतात ज्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही. काँग्रेसवाल्यांचे कपडे ते इतके का खराब करत आहेत? राहुल गांधी फिरतात तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही फिरावं”, असं दुश्यंत गौतम म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्याने राहुल गांधींची केली प्रभू श्रीरामाशी तुलना; म्हणाले…
“तो प्रसाद कोणता हे राहुल गांधींनी सांगावं”
“राहुल गांधींनीच सांगावं की ते असं काय घेतात ज्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही. तो कोणता प्रसाद आहे, ज्यामुळे थंडी वाजत नाही. तो प्रसाद इतरांनाही वाटायला हवा. त्यांच्या आईला आणि त्यांच्या बहिणीलाही त्यांनी तो प्रसाद द्यायला हवा”, असंही गौतम म्हणाले.