लोकसभा निवडणूक व हिंदी भाषिक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांमुळे मुस्लीम जनाधार गमावणाऱ्या काँग्रेसने बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत एआयएमआयएमला साथीला घेण्याची चाचपणी सुरू केली आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाची भेट घेत अल्पसंख्याकांच्या रक्षणाची ग्वाही दिली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने एआयएमआयएमचे खासदार असासुद्दीन ओवैसी यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
थेट आघाडी झाली नाही तरी महापालिका निवडणुकीत मुस्लीम व दलितबहुल मतदारसंघांत परस्परांची मदत करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून एआयएमआयएमला देण्यात येईल. संभाव्य आघाडीची व परस्परांना छुप्या मदतीसाठी समीकरणे निश्चित करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम शुक्रवारी सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.
या भेटीत ओवैसी उपस्थित राहणार असल्याचे वृत्त पसरले होते. मात्र याचा इन्कार करीत ओवैसी यांनी काँग्रेस नेते अधिकृतपणे माझ्याशी चर्चा झाल्याचे म्हणत असतील तरच मी प्रत्युत्तर देईन, अशी भूमिका घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांनी काँग्रेसचे बहुसंख्य समुदायाकडे दुर्लक्ष झाल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यात पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लीम समुदायाने काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत साथ दिली नाही. दिल्लीत सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला साधे खातेही उघडता आले नाही. दिल्लीची पुनरावृत्ती झाल्यास विविध राज्यांमध्ये भाजपविरोधात मतदान करणारे काँग्रेसऐवजी प्रादेशिक पक्षांना समर्थन देतील व काँग्रेसचा जनाधार संपेल, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटत असल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा व औरंगाबाद महापालिका निवडणुकीत धडक कामगिरी करणाऱ्या एआयएमआयएमशी हातमिळवणी करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र एआयएमआयएमशी युती केल्यास बहुसंख्य समाजाची मते एकवटतील. त्यामुळे प्रत्यक्ष युती होणार नसली तरी परस्पर सामंजस्याने निवडणुकीत छुपी युती करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
अल्पसंख्याकबहुल मतदारसंघांत परस्परांना मदत करण्याची रणनीती निरुपम-अहमद पटेल यांच्या बैठकीत आखण्यात येणार आहे.
एआयएमआयएमशी हातमिळवणीसाठी काँग्रेसची चाचपणी!
लोकसभा निवडणूक व हिंदी भाषिक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांमुळे मुस्लीम जनाधार गमावणाऱ्या काँग्रेसने बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत एआयएमआयएमला साथीला घेण्याची चाचपणी सुरू केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-06-2015 at 06:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress seeking mim possible alliance