सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी, सोमवारी हिंसाचाराचा आगडोंब उसळला. त्यात एका पोलिसासह इतर काही नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले. यावरून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी टीका केली आहे. त्यांनी एक ट्विट करत ‘ये कहाँ आ गए हम’ असं म्हणत एक ट्वीट केलं आहे.
शशी थरूर यांनी आपल्या ट्विटरवरून दिल्लीतील हिंसाचाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा कसला दंड आहे, हे कसले शुल्क आहे? हा माझा देश आहे, यावर विश्वास बसत नाहीये. कुठे आलो आहोत आपण अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.
किस बात का जुर्माना है, ये कैसा शुल्क है?
यकीं नही होता, क्या ये मेरा मुल्क है?
ये कहाँ आ गए हम …. pic.twitter.com/L5fJZKlg53— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 24, 2020
आणखी वाचा – दिल्ली हिंसाचार : मौजपूरमध्ये गोळीबार करणारा तरुण पकडला
दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यांवरील वाहने, आसपासच्या घरांना तसेच, गोदाम-दुकाने यांनाही आग लावण्यात आली. एका तरुणाने पोलिसांवर पिस्तूल रोखून धरले आणि नंतर हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात रतन लाल या पोलीस हवालदारासह काही नागरिकांचा मृत्यू झाला. हिंसाचारात पोलीस उपायुक्तांसह किमान दहा पोलीस जखमी झाले.
आणखी वाचा – दिल्लीतील हिंसाचारावर ओवेसींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी जवान तनात करण्यात आले. पोलिसांनी अश्रुधुरांच्या कांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मेट्रो रेल्वे स्थानकेही बंद करण्यात आली आहेत. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत पोहोचण्याच्या काही तास आधी हिंसाचार भडकला होता.