केंद्रातील एनडीए सरकारला लक्ष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ९ जून रोजी काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे.
लोकसभा निवडणुकीत यूपीएचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने अशा प्रकारची पहिलीच बैठक आयोजित केली असून त्याला पक्षाचे ज्येष्ठ नेते, सचिव आणि अन्य महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीची कार्यक्रमपत्रिका मात्र अद्याप ठरलेली नाही.
अखिल भारतीय काँग्रेस समिती मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत असतानाही काँग्रेसशासित राज्ये त्या प्रमाणात आक्रमक झालेली नाहीत. काही राज्यांमध्ये पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढवत असतानाही काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री तशी आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत, असे एका नेत्याने सांगितले.