आज संपूर्ण देशभरात रामनवमी हा सण उत्सहात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी भाविकांकडून प्रभू रामाची मिरवणूक काढली जात आहे. दरम्यान, काँग्रेसने राहुल गांधींचा जुना व्हिडीओ शेअर करत रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जुन्या भाषणातील काही भागही शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी प्रभू रामाच्या विचारांबद्दल बोलत आहे.
राहुल गांधी संबंधित व्हिडीओत म्हणत आहेत की, “प्रभू रामचंद्रांचा एक विचार होता. ते सगळ्यांचा आदर करायचे. ते कुणाचाही द्वेष करत नव्हते. प्रभू रामचंद्रांची जी भावना होती, त्या भावनेनं आपण आपलं जीवन जगू… आपण प्रभू रामाला समजून घ्यायला हवं. त्यांची भावना आणि जीवन जगण्याच्या पद्धतीला समजून घ्यायला हवं. त्यांनी फक्त आणि फक्त प्रेम आणि बंधुभावाची भाषा केली होती, सन्मानाची भाषा केली. त्यांनी कधीही द्वेषाची भाषा केली नाही. हिंसेची भाषा केली नाही.”
खरं तर, काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी ‘भारत जोडो यात्रा’ काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर असा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास केला. भारतातील विविध धर्मांना जोडण्याच्या हेतुने राहुल गांधी यांनी ही पदयात्रा काढली.
या यात्रेदरम्यान, त्यांनी सत्य, अहिंसा आणि प्रेमाचा प्रचार केला. या यात्रेचा भाग म्हणून त्यांनी वाराणसी येथे जाऊन देवाची पूजा केली. याचवेळी केलेला भाषणाचा काही भाग काँग्रेसने पुन्हा शेअर करत रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.