गेल्या काही दिवसांपासून २००२मधील गुजरात दंगली आणि सर्वोच्च न्यायालयाकडून यासंदर्भातल्या एका प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेली क्लीनचिट या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. झकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत न्यायालयाने मोदींना या प्रकरणात क्लीनचिट दिल्यानंतर त्यावरून भाजपानं विरोधकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील या मुद्द्यावरून विरोधकांना सुनावण्यात आल्यानंतर आता त्यावरून काँग्रेसनं भाजपाला टोला लगावला आहे. यासाठी काँग्रेसकडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.
मोदींविरोधात कारस्थानाचा आरोप!
गुजरात दंगलींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर भाजपाकडून हा मोदींविरोधातल्या कटाचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “काँग्रेसप्रणीत विरोधकांकडून हे सूडाचं राजकारण केलं जात आहे. काही तथाकथित स्वयंसेवी संस्था आणि विचारवंतांची देखीलल त्यांना साथ आहे. विदेशी माध्यमांचा एक गटही यात सामील आहे. हे सगळे मिळून कारस्थान करत आहेत. गेली कित्येक वर्ष निराधार आरोप आणि हेतुपुरस्सर कट-कारस्थान होत असूनही मोदींनी कधीही भारतीय राज्यघटनेवरचा, न्यायव्यवस्थेवरचा आपला विश्वास ढळू दिला नाही. सरतेशेवटी ते यातून सहीसलामत बाहेर पडले”, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आलेल्या ठरावात घेण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपाच्या याच भूमिकेवरून काँग्रेसनं टोला लगावला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उद्देशून राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ असून त्यामध्ये दंगली झाल्या तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे देखील तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत दिसत आहेत. यात वाजपेयी मोदींना एक सल्ला देताना दिसत आहेत.
काय म्हणाले होते वाजपेयी?
अटल बिहारी वाजपेयी यांनी या व्हिडीओमध्ये मोदींना जनतेमध्ये भेदभाव न करण्याचा सल्ला दिला आहे. “माझा एकच संदेश आहे की त्यांनी राजधर्माचं पालन करावं. राजासाठी किंवा शासकासाठी प्रजेमध्ये भेद असू शकत नाही. ना जन्माच्या आधारावर, ना जातीच्या आधारावर ना समाजाच्या आधारावर”, असं सांगताना वाजपेयी दिसत आहेत.
‘अहमद पटेल आणि तीस्ता सेटलवाड यांच्या कटामागे सोनिया गांधींचा हात’; भाजपाचा गंभीर आरोप
दरम्यान, वाजपेयींचं हे विधान संपताक्षणीच बाजूला बसलेल्या नरेंद्र मोदी यांनी तिथेच उत्तर देत “आम्हीही तेच करत आहोत साहेब”, असं म्हटल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
या व्हिडिओसोबत श्रीनिवास यांनी भाजपाला खोचक सवाल केला आहे. “नड्डाजी, गुजरात दंगलींनंतर मोदींना कारस्थान रचून बदनाम करण्याच्या कटामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी देखील सहभागी होते का?” असा सवाल त्यांनी ट्वीटमधून केला आहे.