काँग्रेस पक्ष वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकामागची भूमिका लक्षात घेऊन आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यासाठी मदत करेल, असा आशावाद शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केला. जीएसटी ही युपीए सरकारच्या काळातील महत्त्वपूर्ण सुधारणा होती. मला जीएसटीच्या संकल्पनेचे श्रेय कुणाला द्यायचे झाले तर ते काँग्रेसलाच द्यावे लागेल. मात्र, जेव्हा संकल्पना मांडणाराच त्याच्याविरोधात उभा ठाकतो, तेव्हा मी काय करू शकतो, मी त्यासाठी त्यांच्यापर्यंत जाऊन संवाद साधला. मी त्यांना स्पष्टीकरण देऊन जीएसटीचे महत्त्वही समजवून सांगितले. आता मला आशा आहे की, त्यांना जीएसटी विधेयक मंजूर होण्यामागील कारण लक्षात आले असावे. यावेळी काँग्रेसने जीएसटीसंदर्भात उपस्थित केलेल्या आक्षेपांनाही जेटली यांनी उत्तर दिले. जे स्वत:हून आणले त्याच गोष्टीचा काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. युपीएतील घटक पक्ष जीएसटीला जाहीरपणे पाठिंबा देत आहेत. मात्र, काँग्रेस याबद्दल पुनर्विचार का करत आहे, हे मला समजत नाही. जीएसटीमधील एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर मी त्यासाठी तयार आहे. आपण पुढच्या पिढीवर सदोष कायद्यांची बंधने आणता कामा नये, असे मत जेटलींनी यावेळी व्यक्त केले.