नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या प्रेषित मुहम्मद पैगंबरांसंदर्भातील वादग्रस्त विधानामुळे विरोधकांना भाजपविरोधात कोलीत मिळाले आहे. नूपुर यांचे निलंबन म्हणजे ‘’सौ चुहे खा कर बिल्ली हज को चली’’ असा प्रकार असून भाजपची ‘लज्जास्पद धर्माधता’ देशाला आतून पोखरत असल्याची आरोप काँग्रेसने सोमवारी केला.

अंतर्गत फुटीमुळे देश बाहेरूनही (आंतरराष्ट्रीत स्तरावर) कमकुवत होत आहे. भाजपच्या लाजीरवाण्या कट्टरतेमुळे जागतिक स्तरावर आपण एकटे पडलो, एवढेच नव्हे तर आपली प्रतिष्ठाही खालावली, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करायचे, लोकांमध्ये द्वेष पसरवायचा आणि सर्व धर्माचा आदर करत असल्याचा देखावाही करायचा, हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. स्मशान, कब्रस्तान, ८० विरुद्ध २०, बुलडोझर, मस्ती जिरवणे..असे शब्द भाजपने प्रचलित केले असून मतांच्या राजकारणासाठी नवा शब्दकोष तयार केला आहे, अशी टिप्पणी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली. भाजपला धर्माध राजकारणाचा पश्चाताप होत नसून तो सरडय़ासारखे रंग बदलत आहे. त्यातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी धडा घेतला पाहिजे. पक्ष त्यांचा प्याद्यासारखा वापर करतो आणि गरज संपल्यानंतर त्यांना फेकून दिले जाते, अशी टीकाही करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पाठिंबा असल्याचा दावा सातत्याने नूपुर  शर्मा यांनी केला होता. मग, त्यांना निलंबित का केले गेले? धार्मिक भावना भडकवणाऱ्यांविरोधात गुन्हे का दाखल झाले नाहीत? भारतीय वंशाचे ३ कोटी २० लाख लोक परदेशात काम करतात, त्यापैकी १.५० कोटी लोक आखाती देशांमध्ये आहेत, हे भाजपला माहिती आहे का, अशी टिप्पणीही करण्यात आली आहे.

काँग्रेसच नव्हे तर, भाजपशी जवळीक साधणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही भाजपवर टीका केली आहे. प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांविरोधात भाजपने कायदेशीर कारवाई केली पाहिजे. निव्वळ निलंबित करणे वा हकालपट्टी करणे पुरेसे नाही, या व्यक्तींना तुरुंगात टाकले पाहिजे, असे मायावती म्हणाल्या. भाजपच्या धार्मिक कट्टरतेसाठी देशाने कशासाठी माफी मागायची, रात्रंदिवस लोकांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या भाजपने देशवासीयांची माफी मागितली पाहिजे, असा संताप राष्ट्रीय तेलंगण समितीचे नेता व मंत्री के. टी. रामाराव यांनी व्यक्त केला.

शर्माना धमक्या, गुन्हा दाखल जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार नूूपुर शर्मा यांनी २८ मे रोजी दिल्ली पोलिसांकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांच्या सायबर विभागाने अज्ञातांविरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला. दहा दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत नूूपुर यांनी वादग्रस्त विधान केले होते.

Story img Loader