कर्नाटकच्या निवडणुकांचे घोडामैदान आता जवळ आले आहे. अशात भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच काँटे की टक्कर बघायला मिळणार आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशात आता कर्नाटकमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अनेक याद्यांमधून हजारो मतदारांची नावेच गायब झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जर मतदारांची नावेच यादीतून गायब झाली असतील तर त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. यामागे भाजपाचे षडयंत्र आहे असाही आरोप काँग्रेसने केला.
२०१३ आणि २०१८ या दोन्ही वर्षांच्या मतदार याद्या आम्ही तपासल्या आम्हाला या याद्यांतून सुमारे ३० ते ३५ लाख मतदारांची गायब झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला समजली आहे, असे सय्यद नासीर हुसैन यांनी सांगितले आहे. यामागे नेमके काय कारण आहे हे शोधावे लागेल. काही मतदारांचे मृत्यू झाले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही पण मतदार यादीत घोळ आहे हे नक्की असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
काँग्रेस पक्षाची तत्त्वे जे मतदार मानतात ते आम्हालाच मतदान करणार आहेत. असे मतदार भाजपाला अडचणीत आणणारे ठरू शकतात. त्यांना मतदानाचा हक्कच बजावता येऊ नये म्हणून मतदार याद्यांमधून त्यांची नावेच गायब केल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या ऐश्वर्या महादेव यांनी केला आहे. सुमारे १८ लाख नावे विविध भागातील मतदार याद्यांमधून गायब आहेत असा आरोप त्यांनी केला. आता काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना भाजपा काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.