आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि माजी पोलीस अधिकारी किरण बेदी हे पक्के संधिसाधू असून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, ते गमावलेला जनाधार मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
 केजरीवाल आणि बेदी यांनी, कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही, असे जाहीर केले होते. परंतु भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाद्वारे सत्ता काबीज करण्याच्या त्यांच्या संधिसाधूपणाविरुद्ध आमचा लढा आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आडून केजरीवाल आणि बेदी यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पुढे रेटली. या दोघांमध्ये काहीही फरक नाही, एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत, असेही माकन म्हणाले. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाची भूमिका चव्हाटय़ावर आणणारी पुस्तिका पुढील आठवडय़ात काँग्रेस प्रकाशित करणार आहे, असेही ते म्हणाले.
‘नाराजीचे वृत्त निराधार’
माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याने सरसंघचालक मोहन भागवत नाराज झाले असल्याचे वृत्त निराधार असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. केंद्रातील भाजपचे सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याचे वाईट चित्र रंगविण्यात येत आहे, असेही संघाने स्पष्ट केले आहे.
किरण बेदी यांना भाजपमध्ये प्रवेश देणे मोहन भागवत यांना अमान्य असल्याचे वृत्त निराधार आहे, केंद्र सरकार आणि संघ यांच्यात तिढा निर्माण झाल्याचे चित्र रंगविण्याचा हा प्रयत्न आहे, असे संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी म्हटले आहे.

Story img Loader