लडाखमधील स्थानिक मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमधील संघर्षाचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) मेंढ्या चरणाऱ्या लडाखमधील मेंढपाळांना तिथून हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी मेंढपाळांनीदेखील चिनी सैनिकांचा प्रतिकार केला. मेंढपाळांनी चिनी सैनिकांना निक्षून सांगितलं की, ‘ही भारताची हद्द आहे’. हा व्हिडीओ लडाखच्या पूर्व भागातला असल्याचं सागितलं जात आहे. दरम्यान, चिनी सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसून भारतीय नागरिकांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण जबाबदार असल्याचा टोला लगावला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पूर्व लडाख प्रांतातील स्थानिक पशुपालकांनी एलएसीजवळच्या (LAC) भागात गुरे चरायला नेली नव्हती. पूर्व लडाखमधील पशूपालकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या कुरणांमध्ये गुरे चरायला नेण्याची ही गेल्या दोन वर्षांमधली पहिलीच घटना आहे. त्याचवेळी चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले आणि त्यांनी लडाखी मेंढपाळांना तिथून हुसकावण्याचा प्रयत्न केला, असा दावा काँग्रेसने केला आहे. यावेळी भारतीय पशूपालकांनी या जमिनीवर आपला हक्क सांगितला, तसेच चिनी सैनिकांना माघार घ्यायला लावली.
चिनी सैनिकांच्या या घुसखोरीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, मोदी सरकार नेहमी दावा करत असतं की देशाच्या सीमेवर सारं काही आलबेल आहे. परंतु, आज लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैनिक आणि भारतीय मेंढपाळांमध्ये झालेल्या संघर्षाने मोदींच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. पंतप्रधानांनी १९ जून २०२० रोजी चीनला क्लीन चिट दिल्यामुळेच आज हे घडतंय. त्यावेळी मोदींनी म्हटलं होतं की, भारताच्या हद्दीत कोणीही घुसलेलं नाही, तसेच कोणीही घुसखोरी केली नाही. त्यामुळे आता मोदींनीच सांगावं की सीमेवरील परिस्थिती पूर्ववत कधी होईल?
दरम्यान, काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे की, भारताच्या हद्दीत घुसण्याची चीनची हिंमत कशी झाली? यावेळी पुन्हा एकदा मोदी चीनला क्लीन चिट देत कोणीही घुसखोरी केली नाही असा निर्वाळा देणार का? चिनी सैनिकांच्या या घुसखोरीबद्दल सरकारने चीनला कडक शब्दांत संदेश द्यायला हवा.