काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा पराभव करून एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीमुळे खरगे यांच्या रुपाने काँग्रेसला अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. दरम्यान निवडणूक संपताच काँग्रेसने शशी थरुर यांना फटकारलं आहे. शशी थरुर यांनी निवडणुकीत अनियिमितता असल्याचा गंभीर आरोप केला होता. काँग्रेसने यावर नाराजी जाहीर करत शशी थरुर यांना दुतोंडी म्हटलं आहे.

“मला माफ करा, पण तुम्ही माझ्यासमोर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली सांगत समाधान व्यक्त करता आणि प्रसारमाध्यमांसमोर मात्र वेगळंच वागता. त्यांच्यासमोर जाऊन आमच्यावर गंभीर आरोप करता,” अशा शब्दांत निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांनी शशी थरुर यांच्या गटाला फटकारलं.

काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे ; अडीच दशकांत पहिल्यांदाच पक्षनेतृत्वपदी बिगर-गांधी

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे यांना ७,८९७, तर थरूर यांना १,०७२ मते मिळाली. ४१६ मते अवैध ठरली. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या भाजपसह विरोधकांना काँग्रेसने या निवडणुकीद्वारे उत्तर दिल्याचे मानलं जातं.

मतमोजणी सुरु असताना थरूर यांच्या गटाने उत्तर प्रदेश, पंजाब आणि तेलंगणमधील मतदान प्रक्रियेबाबत आक्षेप घेत तक्रारी केल्या. ‘‘या तक्रारींत तथ्य नाही. यासंदर्भातील पत्रातील प्रत्येक मुद्दय़ाला उत्तर दिलं जाईल. मात्र, हे पत्र माध्यमांत प्रसृत न करत थेट पक्षाच्या निवडणूक विभागाला द्यायला हवं होतं’’, असं मिस्त्री म्हणाले होते.

शशी थरुर यांनी नंतर पक्षातील अंतर्गत पत्र लीक झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. “आम्ही तुमची विनंती मान्य केली असतानाही तुम्ही मीडियासमोर जाऊन केंद्रीय निवडणूक प्राधिकरण तुमच्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप केला,” असं मिस्त्री यांनी म्हटलं आहे. संपूर्ण प्रक्रियाच चुकीची आहे असं दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला असंही त्यांनी सुनावलं आहे.