जागतिक उपासमार निर्देशांक अर्थात Global Hunger Index 2023 मध्ये भारताची झालेली घसरण सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. १२५ देशांच्या या यादीत भारताचं स्थान १११वं आहे. गेल्या वर्षी भारत यादीत १०७व्या स्थानावर होता. या वर्षी त्यातही घसरण होत १११व्या स्थानी भारताची घसरण झाली आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून हा निर्देशांकच चुकीच्या पद्धतीने काढण्यात येत असल्याची सारवासारव केली जात आहे. त्यावरून आता काँग्रेसनं सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. स्मृती इराणी यांनी यासंदर्भात केलेल्या एका विधानावर काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.
काय म्हणाल्या स्मृती इराणी?
शुक्रवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. जागतिक उपासमार निर्देशांकाबाबत स्मृती इराणी यांनी या कार्यक्रमात खिल्ली उडणवारं विधान केलं. “काही निर्देशांक जाणून बुजून भारतातील खरी परिस्थिती दाखवत नाहीत. उदाहरणार्थ, जागतिक उपासमार निर्देशांक. अनेक लोक म्हणतात हे फसवे आहेत. हे लोक भारतात १४० कोटींच्या लोकसंख्येपैकी ३ हजार लोकांना फोन करून विचारतात की तुम्ही उपाशी आहात का? त्यावरून ते हे निर्देशांक बनवतात”, असं स्मृती इराणी या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
“आज मी पहाटे चार वाजता माझ्या दिल्लीतल्या घरातून निघाले. ५ वाजता कोचीनसाठीच्या विमानात बसले. तिथे मी एका कॉनक्लेव्हमध्ये गेले. संध्याकाळी ५ वाजता या कार्यक्रमाला येण्यासाठी मी पुन्हा विमानात बसले. आता मी काही खाईन, तोपर्यंत १० वाजले असतील. जर तुम्ही आज दिवसभरात मला फोन करून विचारलं की तुम्ही उपाशी आहात का? तर मी सांगेन, हो अर्थात”, असंही इराणी म्हणाल्या. “या निर्देशांकानुसार पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा चांगली स्थिती आहे म्हणे. हे शक्य आहे का?” असंही त्यांनी नमूद केलं.
Global Hunger Index मध्ये भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण; १२५ देशांमध्ये १११व्या स्थानी!
काँग्रेसचं स्मृती इराणींवर टीकास्र
दरम्यान, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनते यांनी स्मृती इराणींच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “मला हे कळत नाहीये की जास्त लाजिरवाणं काय आहे. तुमच्या दुर्लक्षाची पातळी की असंवेदनशीलतेची पातळी? तुम्हाला खरंच असं वाटतं की ग्लोबल हंगर इंडेक्स फक्त लोकांना फोन करून ते उपाशी आहेत का? हा प्रश्न विचारून तयार केला जातो? तुम्ही देशाच्या मंत्री आहात. तुमच्याकडून हे ऐकणं दुर्दैवी आहे”, असं सुप्रिया श्रीनते यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“चार महत्त्वाच्या निकषांवर आधारित माहितीच्या आधारे ही यादी तयार केली जाते. कृपया उपासमारीची चेष्टा करू नका. तुम्ही एक शक्तीशाली महिला आहात. केंद्रात मंत्री आहात. तुमच्यासाठी विमानात व तुम्ही जिथे जाता तिथे पुरेसं, किंबहुना जास्तच अन्न उपलब्ध आहे”, असंही सुप्रिया श्रीनते यांनी नमूद केलं आहे.