राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून  काँग्रेस आणि जदयू यांच्यातल्या वादाची भट्टी चांगलीच पेटली आहे असेच दिसून येते आहे. नितीशकुमार यांनी रामनाथ कोविंद या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यापासून काँग्रेस आणि नितीशकुमार यांच्यात वाद रंगले आहेत. अशात आता जदयूचे नेते के.सी. त्यागी यांनीही आपले मौन सोडत काँग्रेसवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान आम्ही योग्य उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठरले होते. मात्र काँग्रेसने आमचे नेते नितीशकुमार यांची इमेज बिघडवली अशी टीका आता त्यागी यांनी केली आहे. त्यामुळेच आता काँग्रेस आणि जदयू यांच्यातला वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

रामनाथ कोविंद हा अत्यंत चांगला चेहरा आहे, ते चांगले राष्ट्रपती होऊ शकतात म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे, असे असतानाही नितीशकुमार हे संधीसाधू नेते आहेत अशी टीका काँग्रेस प्रवक्ते गुलाम नबी आझाद यांनी केली होती. ही टीका आपल्याला अजिबात पटलेली नाही असेही त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यात जी बैठक झाली त्यामध्ये महाआघाडीतल्या १७ पक्षांनी ठरवले होते की, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार काँग्रेसचा नसेल असे असूनही, काँग्रेसने आपलाच उमेदवार दिला. इतकेच नाही तर तो आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला असेही त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. मीरा कुमार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हरवण्यासाठीच उभे केलेत ना? असा प्रश्न नितीशकुमारांनी विचारला होता. ज्यानंतर जदयू आणि काँग्रेस या दोन पक्षांमधला वाद चव्हाट्यावर आला होता.

आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने जर योग्य उमेदवार दिला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, ‘योग्य  उमेदवाराला पाठिंबा’ ही आमची भूमिका आहे असेही त्यागी यांनी स्पष्ट केले आहे. जर काँग्रेसने उपराष्ट्रपतीपदासाठी चांगला उमेदवार दिला आणि तसा प्रस्ताव आमचे नेते नितीशकुमार यांच्यासमोर ठेवला तर त्यावर निश्चितपणे विचार करता येईल. मात्र सध्याच्या काळात नितीशकुमार या आमच्या प्रमुख नेत्याची इमेज बिघडवण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

एनडीएने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड केली आहे. ज्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी निश्चित केले आहे. असे असले तरीही जदयूने कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. ज्यानंतर लालूप्रसाद यादव यांनीही नितीशकुमारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला आहे. आता या वादात के. सी. त्यागी यांनीही उडी घेत काँग्रेसवर टीकेचे बाण चालवले आहेत.

 

 

 

Story img Loader