संसदेचे कामकाज ठप्प; जीएसटी टांगणीवर
‘नॅशनल हेराल्ड’ या बंद पडलेल्या वर्तमानपत्राच्या कोटय़वधींच्या मालमत्ताप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जारी केलेला समन्स दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द करण्यास नकार दिल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांत या प्रकरणाचे पडसाद उमटले. सभागृहांत काँग्रेस खासदारांनी केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढविला. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाल्याने काँग्रेस खासदार कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रवक्ते व ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी सोनिया व राहुल १९ डिसेंबर रोजी कनिष्ठ न्यायालयात उपस्थित राहतील, असे आश्वासन आरोपींचे वकील व पक्ष प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी उच्च न्यायालयात दिल्याने पक्षावर आलेली नामुश्की काही दिवसांपुरती टळली आहे. आता सोनिया व राहुल गांधी यांना १९ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहणे अनिवार्य ठरणार आहे. दिवसभर संसद याच प्रकरणावरून दणाणली. थेट सोनिया व राहुल गांधी यांच्याभोवतीच कारवाईचा फास आवळल्याने हिवाळी अधिवेशनात एकही दिवस कामकाज होऊ न देण्याचा चंग काँग्रेस खासदारांनी बांधला आहे. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
जीएसटी लटकणार?
* तामिळनाडू दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी बुधवारी अजून आक्रमकपणे सरकारच्या सुडाच्या राजकारणाविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केल्याने सत्ताधाऱ्यांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला आहे.
* या संदर्भात संसदीय कामकाजमंत्री वंकय्या नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. नायडू यांनी संसदीय राज्यमंत्र्यांनादेखील या संदर्भात सूचना दिल्या.
* काँग्रेस खासदार आक्रमक झाल्याने बुधवारी संसदेत कामकाज होण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर कोणत्याही परिस्थितीत जीएसटी मंजूर होऊ देणार नाही, असा संदेश काँग्रेस नेत्यांनी भाजपला दिला आहे.

Story img Loader