काँग्रेस उद्याच्या बैठकीत पुढील वर्षाचा कार्यक्रम निश्चित करणार

नवी दिल्ली : बेळगाव येथे गुरुवारी होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा उचलून धरला जाणार आहे. नव सत्याग्रह बैठक असे नामकरण केलेल्या कार्यकारिणीमध्ये पुढील वर्षासाठी कृती आराखडा निश्चित केला जाईल असे पक्षाच्या पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनानाल १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदाच्या कार्यकारणी समितीची बैठक बेळगावला होत आहे. या बैठकीत डॉ. आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा लावून धरला जाईल आणि त्याचा पाठपुरावा केला जाईल. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, पक्षाचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा आणि पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. या बैठकीत दोन ठराव मंजूर केले जातील अशी माहिती देण्यात आली. २७ डिसेंबरला पक्षातर्फे बेळगावमध्ये जय बापू, जय भीम, जय संविधान मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. काही वर्षांपूर्वी उदयपूरमधील चिंतन शिबिरामध्ये भारत जोडो यात्रेची संकल्पना मांडली होती. बेळगावमध्येही एखादा ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची आशा आहे असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘सेबी’प्रमुख, तक्रारदार यांना पाचारण; भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून लोकपालांसमोर तोंडी सुनावणी

काँग्रेसतर्फे हा आठवडा आंबेडकर सन्मान सप्ताह मानला जात आहे. अमित शहांना हटवले पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या टिप्पणीबद्दल माफी मागितली पाहिजे या मागणीचा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला राज्यघटना हटवायची आहे या आरोपाचा रमेश यांनी पुनरुच्चार केला.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यांनी संसदेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी पायऱ्यांना वंदन केले होते. त्यानंतर जुन्या इमारतीचा त्याग करण्यात आला आणि नवीन इमारत बांधण्यात आली. यावर्षी २६ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी राज्यघटनेच्या मूळ प्रतीला वंदन केले, याचा अर्थ नवीन राज्यघटना आणली जाईल,’’ असा दावा रमेश यांनी केला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच मंदिर-मशीद वादाचे मुद्दे उपस्थित न करण्याबद्दल विधान केले होते. मात्र, त्यांचे हे विधान म्हणजे दुटप्पीपणा आहे अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress strategy in cwc meeting to target amit shah over ambedkar remark zws