पीटीआय, जयपूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिष्ठा आणि लोकशाहीच्या चिंध्या करत असल्याची जोरदार टीका काँग्रेसने शनिवारी केली. राजस्थानची राजधानी जयपूर येथे काँग्रेसच्या प्रचारसभेत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सत्ताधारी भाजप आणि नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.

या वेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांत देश अशा सरकारच्या हातात आहे की, देशात बेरोजगारी, महागाई, आर्थिक संकटे आणि विषमता वाढवण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. त्यांनी आरोप केला की, ‘‘आज आपल्या देशातील लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही संस्था नष्ट केल्या जात आहेत आणि आपली राज्यघटना बदलण्यासाठी कारस्थान रचले जात आहे. ही हुकूमशाही आहे आणि आम्ही त्याला उत्तर देऊ’’. त्या पुढे म्हणाल्या की, ‘‘मोदीजी स्वत:ला थोर समजतात, त्यांनी या देशाची प्रतिष्ठा आणि लोकशाही यांच्या चिंध्या केल्या आहेत. संपूर्ण व्यवस्थेमध्ये भीती बसवली जात आहे’’. विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये सहभागी व्हावे यासाठी विविध क्लृप्तय़ा लढवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी आला.

हेही वाचा >>>राजकारण वाईट! पत्नी काँग्रेसची आमदार, बसपाचा उमेदवार असलेल्या पतीला सोडावं लागलं घर

पक्षाध्यक्ष खरगे यांनी मोदींचे वर्णन ‘‘खोटारडय़ांचे नेते’’ असे केले. त्यांनी सुरुवातीला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काय केले असा प्रश्न त्यांनी विचारला. चीन भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करत आहे, भारतीय गावांची नावे बदलत आहे पण पंतप्रधान मोदी त्याबद्दल बोलत नाहीत असे ते म्हणाले. शुक्रवारी चुरू येथे झालेल्या भाजपच्या सभेचा संदर्भ देऊन खरगे म्हणाले की मोदींनी जिथे आपण शेतकऱ्यांसाठी काय काम केले हे सांगायला पाहिजे तिथे ते अनुच्छेद ३७० रद्द करण्याविषयी बोलले. काँग्रेसने ५५ वर्षे देशाच्या विकासासाठी काम केले. पायाभूत सुविधा उभारल्या, आयआयटी व आयआयएमसारख्या संस्था तयार केल्या. पण मोदी केवळ काँग्रेस सरकारने टाकलेल्या रुळांवरून धावणाऱ्या गाडय़ांना झेंडा दाखवून श्रेय घेत आहेत, अशी टीका खरगे यांनी केली.

प्रियंका गांधी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झालेल्या अटकेचा उल्लेख करत भाजप विरोधकांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला. मोदींची ‘अब की बार, ४०० पार’ ही घोषणा खरी ठरणार नाही असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress strongly criticized prime minister narendra modi for destroying the country reputation and democracy amy