नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या वटहुकुमाविरोधात सोमवारी काँग्रेसने अखेर आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या विधेयकाला भाजपेतर पक्ष एकत्रित विरोध करतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले.
बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वत:हून पुढाकार घेतला असून सोमवारी त्यांनी पुढच्या आखणीसाठी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नितीशकुमार यांनी वटहुकुमाच्या मुद्दय़ावरही चर्चा केल्याचे समजते. या बैठकीनंतर, काँग्रेसने वटहुकुमाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. संसदेमध्ये दुरुस्ती विधेयकला काँग्रेस विरोध करेल, असे पक्षाचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले.
जमीन, सार्वजनिक व्यवस्था व पोलीस वगळता अन्य प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीतील लोकनियुक्त सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकारही दिल्ली सरकारला मिळाला. पण, केंद्र सरकारने तातडीने वटहुकुम काढून हा अधिकार काढून घेतला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक केंद्र सरकारला मांडावे लागेल. राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्याने सर्व भाजपेतर पक्षांनी विधेयकाला वरिष्ठ सभागृहात विरोध करण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. यासंदर्भात नितीशकुमार यांनीही केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. मात्र, काँग्रेसने ‘आप’ला उघड पाठिंबा दिला नव्हता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतही या मुद्दय़ावर ठोस भूमिका घेण्यास टाळाटाळ केली होती. काँग्रेस व आपचे संबंध सलोख्याचे नसल्याने केजरीवाल यांनी खरगेंची भेट घेण्यापेक्षा नितीशकुमार यांनी खरगेंशी चर्चा करावी, अशी विनंती केजरीवाल यांनी केल्याचे समजते.
ममता बॅनर्जी अनुकूल?
ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या ऐक्याला हिरवा कंदील दिला असून प्रादेशिक पक्षांशी काँग्रेसने जळवून घेण्याची सूचना केली आहे. भाजपशी थेट लढत असलेल्या सुमारे २०० लोकसभा मतदार संघांमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला जाईल, असेही बॅनर्जी यांनी नितीशकुमार यांच्या भेटीत स्पष्ट केले आहे.
विरोधकांच्या ऐक्यासाठी जूनमध्ये पाटण्यात बैठक
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री व जनता दलाचे (संयुक्त) प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांची भेट घेतल्याने विरोधकांच्या ऐक्याला आणखी बळ मिळाल्याचे दिसत आहे. जूनमध्ये पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली जाणार असून तिथे विरोधकांच्या महाआघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विरोधकांची बैठक आयोजित केली जाणार असून पुढील दोन दिवसांमध्ये स्थळ व तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी वेणुगोपाल यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. नितीशकुमारांनी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. खरगेंच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये वटहुकुम, नव्या संसद इमारतीचे उद्घाटन तसेच, विरोधकांच्या ऐक्यासंदर्भातील घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे प्रकृती बिघडल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
नितीशकुमार यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना- ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच, बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक आदींची भेट घेऊन विरोधकांची महाआघाडी उभी करण्यासाठी चर्चा केली आहे. त्यामुळे पाटणा येथे अधिकृतपणे विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते व्यग्र असल्याने ही बैठक लांबणीवर पडली होती. नितीशकुमार यांच्या बैठकीनंतर खरगेंनी, ‘आता देशात ऐक्य निर्माण होईल. लोकशाही मजबूत करणे हाच आमचा संदेश असेल’, असे ट्वीट केले.
वटहुकुमाच्या मुद्दय़ावर काँग्रेसने ‘आप’ला पाठिंबा दिल्यामुळे विरोधकांच्या संभाव्या महाआघाडीमध्ये ‘आप’लाही सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या ऐक्याला हिरवा कंदील दिला असून प्रादेशिक पक्षांशी काँग्रेसने जळवून घेण्याची सूचना केली आहे. भाजपशी थेट लढत असलेल्या सुमारे २०० लोकसभा मतदार संघांमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला जाईल, असेही बॅनर्जी यांनी नितीशकुमार यांच्या भेटीत स्पष्ट केले आहे. या विविध मुद्दय़ांवर विरोधकांच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे समजते.
केजरीवाल उद्यापासून मुंबई भेटीवर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४ व २५ मे रोजी मुंबई दौऱ्यावर असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दिल्लीतील प्रशासनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सनदी सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. पण केंद्र सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारला असलेले अधिकार काढून घेण्याबाबत अध्यादेश जारी केला आहे. याविरोधात केजरीवाल विरोधकांची एकजूट करीत असून यासंदर्भातील विधेयक राज्यसभेत रोखून धरण्याची रणनीती आखली जात आहे. त्यादृष्टीने केजरीवाल मुंबई दौऱ्यावर येत आहेत.