सोशल मीडियाचा वापर करून भाजपकडून होणाऱ्या हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी आता काँग्रेसने पक्षाची ‘सायबर आर्मी’ स्थापन करण्याचे ठरविले आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी सांगितले.
भाजपच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही काँग्रेसची सायबर आर्मी स्थापन करण्याचे ठरविले असून २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पटेल यांनी सोमवारी सायंकाळी पक्षाच्या माहिती-तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेत सांगितले.
जनतेमध्ये फूट पाडणे ही भाजपची विचारसरणी असून त्यांनी आमच्यावर खोटेनाटे आरोप केले आहेत. त्यामुळे त्याचा मुकाबला करण्यासाठी आणि आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे, असेही पटेल म्हणाले. आतापर्यंत खोटेनाटे आरोप गुजरातपुरतेच मर्यादित होते. मात्र आता देशभर ते पसरविले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यूपीएच्या राजवटीत झालेली कामे, भाजपने कशा प्रकारे अपप्रचार चालविला आहे, वस्तुस्थिती काय आहे आणि जनतेला भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत, त्यावर मुख्यत्वे ‘सायबर आर्मी’ प्रकाशझोत टाकणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader