पीटीआय, नवी दिल्ली
कर्नाटकमधील घवघवीत यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्ष नेतृत्वाने भाजपविरोधात थेट लढती होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केद्रीत केले आहे.मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस या राज्यांतील निवडणुकांच्या रणनीतीबाबत विचार करत असून २४ मे रोजी संबंधित राज्यांतील काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित केली आहे.
राजस्थान आणि छत्तीसगड ही काँग्रेसची सत्ता असलेली दोन राज्ये आहेत. या ठिकाणी ‘कर्नाटक रणनीती’चा पुन्हा अवलंब करून विजय मिळवण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. तर, पक्ष मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्याचा पक्षाचा निर्धार आहे.आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी २४ मे रोजी तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरात लवकर नवी रणनीती आखण्याचा विचार आहे.