आगामी लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांपर्यंत पोहोचण्यासाठी महिलांमध्ये नेतृत्वाची फळी उभारणे, वैद्यकीय मदत, कौशल्य विकास आदी उपाययोजनांद्वारे अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्याची व्यूहरचना काँग्रेसने आखली आहे.
सरकारच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी म्हणून त्यांची प्रसिद्धी करण्यावर पक्षाच्या काही नेत्यांनी भर दिलेला आहे. त्याचबरोबर ‘जियो पारसी’ ‘सिखो और कमाओ’, ‘नयी रोशनी’ आदी योजना अल्पसंख्याकांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आल्या असून त्यांचाही प्रसार करण्याचा आग्रह नेत्यांनी धरला आहे.
अल्पसंख्य समाजातील विकलांग लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून नव्या आरोग्यदायी योजना सुरू करण्यावर भर देण्यात येत असून वक्फ सुधारणा, पतधोरण आदी योजनांकडेही काँग्रेसचे विशेष लक्ष आहे. या सर्व योजनांसाठी सन २०१३-१४ या वर्षांत १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तळागातील अल्पसंख्याकांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी विविध अल्पसंख्याकांच्या नेत्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या माध्यमातून सदर नेत्यांची मतमतांतरेही विचारात घेण्यात आली. या वेळी उपस्थित नेत्यांनी काही प्रमाणात संताप आणि चिंता व्यक्त करून मुस्लीम मते पक्षापासून दुरावत असल्यामुळे काही ठोस उपाययोजना करण्यावर भर दिला. समाजाच्या सर्व घटकांमध्ये सुरक्षा आणि निर्भयतेचे वातावरण होण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडले. मुस्लीम जनता आपल्यापासून दुरावत चालली असून अलीकडेच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीतील निकालात त्याचे प्रतिबिंब उमटले आहे, याकडे उत्तर प्रदेशातील एका नेत्याने लक्ष वेधले तर कर्ज घेणे हे अल्पसंख्याकांसाठी अद्यापही कमालीचे कठीण कर्म ठरले आहे, या शब्दांत एका नेत्याने आपली कैफियत मांडली. कर्जासाठीचे दस्तावेज एवढे कठीण असतात की राहुलजी तुम्हीही कर्ज घेऊ शकत नाही, अशी मल्लिनाथी एकाने केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा