मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून आगामी लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडीची मोर्चेबांधणी करण्यासाठी आतुर झालेले समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांना निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. अल्पमतातील मनमोहन सिंग सरकार चालविण्यासाठी सर्वप्रकारच्या राजकीय खेळ्या खेळण्याची तयारी काँग्रेस करीत आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पूर्वार्ध संपता संपता द्रमुकने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनीही मनमोहन सिंग सरकारचे ओझे खांद्यावरून उतरविण्याचे संकेत द्यायला सुरुवात केली आहे. २२ खासदार असलेल्या समाजवादी पक्षाने बाहेरून पाठिंबा काढून घेतल्यास लोकसभेतील संख्याबळ २३० च्या आसपास पोहोचलेल्या सरकारवरील संकट आणखीच गडद होणार आहे. त्यामुळे काँग्रेसने मुलायमसिंह यादव यांच्यावर बाजी उलटविण्यासाठी सर्व उपलब्ध पर्यायांवर विचार सुरू केला आहे.
मुलायमसिंह यादव यांना एकाकी पाडण्यासाठी मनमोहन सिंग सरकार आणि काँग्रेसने २० खासदार असलेल्या जदयुचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या बिहारला विशेष दर्जा देण्याची चर्चा सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख, मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या पश्चिम बंगाललाही भरीव अर्थसाह्य़ाचे गाजर दाखवले आहे. मुलायमसिंहांनी पाठिंबा काढून घेतल्यास त्यांच्या कट्टर विरोधक मायावती काँग्रेसच्या खेळींना साथ देणार हे उघडच आहे. शिवाय लोकसभेत सरकारविरुद्ध मतदानाची वेळ आली तर अनुपस्थित राहण्याचा शब्द काँग्रेसच्या नेत्यांनी द्रमुकचे सर्वोच्च नेते करुणानिधी यांच्याकडून घेतला आहे. प्रसंगी २४ खासदार असलेली माकपच्या नेतृत्वाखालील डावी आघाडीही मतदानाच्या वेळी तटस्थ राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बेहिशेबी संपत्ती आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये मुलायमसिंह यादव यांच्या मर्मस्थळांवर बोट ठेवण्याच्याही चाली आखण्यात येत आहे. मुलायमसिंह यांच्या तिसऱ्या आघाडीच्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस साथ देत असला मुलायम यांच्यासोबत  सांगलीतील कार्यक्रमाला शरद पवार प्रकृती बिघडल्याचे कारण सांगून ऐनवेळी कसे अनुपस्थित राहिले, याकडे काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत.

* जदयुचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या बिहारला विशेष दर्जा देण्यासाठी चर्चा. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख, मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनाही पश्चिम बंगालसाठी भरीव अर्थसाह्य देण्याची तयारी
* मायावतींकडून मदत घेणार. लोकसभेतील मतदानादरम्यान डावे, द्रमुक तटस्थ राहण्यासाठी प्रयत्न.