देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात आणि उत्तम प्रशासन देण्यात केंद्रातील यूपीए सरकार अपयशी ठरले आहे. सत्तारूढ पक्ष मतदारांचे समाधान करू शकलेला नाही. त्यामुळेच मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जातीयवादाचा शिक्का मारून मतदारांना संभ्रमात टाकण्याचा उद्योग सत्तारूढ पक्षाने सुरू केला आहे, अशी टीका भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे.
मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप जातीयवादी आणि अल्पसंख्यविरोधी असल्याची अयोग्य माहिती काँग्रेस पसरवित असल्याचे गडकरी म्हणाले. भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
जाती-धर्माच्या नावावर कोणाचेही लांगूलचालन करण्यावर आमचा विश्वास नाही, तर सर्वाना सामाजिक-आर्थिक न्याय देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लांगूलचालनाचे राजकारण काँग्रेस पक्षाकडून केले जाते. परंतु काँग्रेसला जेव्हा मतदारांना भुलविता येत नाही तेव्हा ते त्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतात, असेही गडकरी म्हणाले.
पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याच्या स्थितीत काँग्रेस पक्ष नाही. त्यामुळेच मतांच्या ध्रुवीकरणासाठी ते भाजपवर जातीयतेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशाला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करण्याऐवजी काँग्रेस जातीय राजकारण करीत आहे, असेही माजी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले.
पुढील सरकार कोणता पक्ष स्थापन करणार, पंतप्रधान कोण होणार, मंत्री कोण होणार हा प्रश्न नाही तर हिंदुस्थानचे रक्षण करणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे स्पष्ट करून गडकरी यांनी, भाजप मतदारांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होऊ देणार नाही, असे सांगितले.

Story img Loader