काँग्रेसने आपल्या माध्यम विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अमित शाहांना आरसा दाखवला असं म्हटलं. ‘काँग्रेस टीव्ही’ नावाच्या या हँडलवरील व्हिडीओत अमित शाह एका पत्रकार परिषदेत बोलताना दिसत आहेत. यावेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारताना कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत प्रश्न विचारला. यावर अमित शाह यांनी उत्तर देणं टाळलं.
व्हिडीओत नेमकं काय?
हा व्हिडीओ एका पत्रकार परिषदेचा असून अमित शाह पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. यावेळी व्यंकटरामन नावाचे पत्रकार आपलं नाव सांगत अमित शाहांचं स्वागत करतात आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात करतात. सुरुवातीला ते अमित शाह यांनी मांडलेल्या भूमिकेवर आपलं मत नोंदवतात आणि शेवटी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारताने भाजपासाठी दरवाजे बंद केल्याचं म्हणतात.
व्हिडीओ पाहा :
पत्रकाराच्या या टिपण्णीनंतर अमित शाह तात्काळ त्यांना रोखतात आणि मला तुमचा प्रश्न कळाला असे म्हणतात. यानंतर शाह पुढील प्रश्न विचारा म्हणतात. त्यावर व्यंकटरामन तुम्ही प्रश्नावर प्रतिक्रिया दिली नाही, असं लक्षात आणून देतात. त्यावर अमित शाह आज राजकारणावर बोलणार नाही, म्हणत प्रतिक्रिया देणं टाळताना दिसले.
हेही वाचा : नव्या संसद भवनात ठेवणार पारंपरिक राजदंड, ‘सेंगोल’विषयी माहिती देताना अमित शाहांनी दिला नेहरुंचा दाखला
या ट्वीटखाली प्रतिक्रियांचा पाऊस आला आहे. यात अनेकांनी अमित शाहांच्या या प्रतिसादावर मिश्किल टीका केली आहे, तर काहींनी कमेंटमध्ये मीम्स पोस्ट केले आहे. दुसरीकडे भाजपा समर्थकांनी कमेंट करत राहुल गांधींवर आरोप करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.