काँग्रेसने डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयांचं होत असलेल्या अवमुल्यनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मोदींचा गुजरातचे मुख्यमंत्री असताना रुपयाच्या अवमुल्यनावर केलेल्या टीकेचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच रुपयाची घसरण होत असताना मोदींजींना ऐका म्हणत चिमटा काढला आहे.

काँग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “रुपया घसरत चालला आहे. १ डॉलर = ८१.१८ रुपये. तुम्ही मोदीजींना ऐका…”

या व्हिडीओत नरेंद्र मोदी म्हणत आहेत, “पंतप्रधानजी देशाला हे जाणून घ्यायचं आहे की, एकट्या भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. याची कारणं काय? हे केवळ आर्थिक कारणांमुळे झालेलं नाही. दिल्लीत केंद्र सरकारचं जे भ्रष्ट राजकारण सुरू आहे त्याचा रुपया घसरण्यात मोठा वाटा आहे. ही खूप गंभीरपणे हा आरोप करत आहे.”

काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी एका व्हिडीओ प्रतिक्रियेत म्हटलं होतं, “आज एक डॉलरची किंमत ८०.८६ वर पोहचली आहे. मात्र, मोदी सरकारने ही घसरण रोखण्याऐवजी वाढवण्याचं काम केलं आहे. मोदीजी, तुम्ही म्हणत होता की रुपया घसरतो तेव्हा देशाचा सन्मान कमी होतो. आणखी देशाचा किती सन्मान कमी होणं बाकी आहे?”

हेही वाचा : काँग्रेसचे आगामी अध्यक्ष गांधी घराण्यातील नसणार – राहुल गांधींनीं स्पष्ट केलं असल्याचं अशोक गेहलोत विधान!

आपल्या अन्य एका ट्वीटमध्ये काँग्रेसने भाजपाने उत्तर प्रदेश निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांवरून टोला लगावला आहे. काँग्रेसने म्हटलं, “उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आधी भाजपाने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली. आता निवडणुकीनंतर भाजपा मोफत वीज देणार नाही, असं म्हणत आहे.”