Madhya Pradesh Assembly Election 2023 : कर्नाटकमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर काँग्रेसने आपला मोर्चा मध्य प्रदेशमध्ये वळवला आहे. कर्नाटकात काँग्रेसने १३६जागा जिंकून बहुमत सिद्ध केलं होतं. आता मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने १५० जागांचा टार्गेट ठरवलं आहे. कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही काँग्रेसला यश मिळेल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली.
मध्य प्रदेशच्या नेत्यांनी आज दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्य युनिटचे प्रमुख कमलनाथ, दिग्विजय सिंह यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूस्ट मिळावा यादृष्टीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
“आम्ही दीर्घ चर्चा केली आहे. कर्नाटकात आम्हाला १३६ जागा मिळाल्या. तर, मध्य प्रदेशात आम्हाला १५० जागा मिळतील”, असं राहुल गांधी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
“मध्य प्रदेशातील निवडणुकीसाठी सुमारे ४ महिने उरले आहेत. बैठकीत मध्य प्रदेशचे भवितव्य आणि राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली,” असे कमलनाथ यांनी बैठकीनंतर सांगितले.
मध्य प्रदेशातील २०१८ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. २०२० मध्ये भाजपानेच मध्य प्रदेशात सत्तास्थापन केली. कमलनाथ यांचं सरकार पाडून भाजपाने सत्ता स्थापन केली. २००५ पासून मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाचं सरकार होतं. त्यामुळ आगामी निवडणुकीत सत्तांतर होतंय की पुन्हा भाजपाच सत्तेवर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कर्नाटकसारखी जादू मध्य प्रदेशात करण्यासाठी काँग्रेसनेच पक्षसंघटन बळकट करण्यास सुरुवात केली आहे.