नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, सिद्धू यांनी पदाचा राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय वर्तुळातून विविध तर्क लावले जात असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षातून देखील अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. सिद्धू यांचा राजीनामा या काँग्रेससाठी धक्का मानला जात असला तरी याबाबत बोलताना एका काँग्रेस कार्यकर्त्याने म्हटलं आहे कि, “काँग्रेससाठी हा धक्का आहे. मात्र, यामुळे फारसा फरक पडणार नाही. कारण सिद्धू हे सुरुवातीपासूनच दलबदलू आहेत.”
‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांना आपल्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत मोठी नाराजी आणि संतापाला सामोरं जावं लागणार आहे. याविषयी एक कार्यकर्ता म्हणाला कि, “हायकमांडने निश्चितच आपल्यापरीने त्यांना संधी दिली. जेणेकरून पक्ष मजबूत होईल. परंतु, उलट पक्ष कमकुवत झाला आहे. सिद्धू यांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे. काँग्रेससाठी हा धक्का आहे. मात्र, सिद्धू हे पहिल्यापासूनच दलबदलू आहेत.” तर दुसरा एक कार्यकर्ता म्हणाल की, “सिद्धू यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.” एकीकडे कार्यकर्त्यांची ही भूमिका असताना कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, “मी आधीच सांगितलं होतं ते स्थिर नाहीत.”
“सिद्धू नव्हे बुद्धू”, काँग्रेसचा संताप
काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याने नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आमच्या पक्षाला असे मूर्ख नको आहेत. ते सिद्धू नव्हते, ते बुद्धू होते. काँग्रेस हायकमांडने चुकीचा निर्णय घेतला”, असं तो कार्यकर्ता म्हणाला. तर, आणखी एक कार्यकर्ता म्हणाला की, “खूप वाईट घडलं. सिद्धू यांनी पदाचा राजीनामा द्यायला नको नको होता. जे पार्टी देत आहे त्यावर समाधानी रहा.”
…मी तडजोड करणार नाही!
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात सिद्धू म्हणतात, ”तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.”