सकाळी १० वाजता दिल्लीमध्ये काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस कार्य समितीची प्रत्यक्ष बैठक दिल्लीमध्ये होत आहे. कार्य समितीची बैठक ही काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची बैठक समजली जाते. कार्य समितीचे सदस्य, विशेष निमंत्रित, पक्षाचे विविध राज्यातील मुख्यमंत्री हे या बैठकीला उपस्थित आहेत.
आगामी पाच राज्यातील निवडणुका, सध्याची देशातील राजकीय परिस्थिती, देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन, इंधन दरवाढ, देशाची आर्थिक परिस्थिती अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. पण त्यापेक्षा काँग्रेसच्या अध्यक्ष निवडीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या बैठकीच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु केली जाणार का ? गांधी परिवारातील नाव हे अध्यक्ष पदासाठी असेल ? का इतर कोणाचे नाव अनपेक्षितपणे पुढे येणार ? पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत काय निर्णय घेतले जातात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. काँग्रेस अध्यक्ष नसणे , पक्षातील निर्णय प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेसमधील जी -२३ गटाने याआधीच पत्र लिहित भुमिका स्पष्ट केली होती. तेव्हा आजच्या कार्य समिती बैठकीत जी-२३ गटातील नेते काय भुमिका मांडणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.