पीटीआय, हैदराबाद : पुनर्रचना केल्यानंतर काँग्रेस कार्यसमितीची पहिली बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी येथे होत आहे. यामध्ये पाच विधानसभा तसेच २०२४च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली जाईल. भारत जोडो यात्रेच्या यशाबद्दलही बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. नव्या काँग्रेस कार्यसमितीत ३९ नियमित सदस्य आहेत. रविवारी विस्तारित कार्यसमितीची बैठक होईल. यामध्ये सर्व प्रदेशाध्यक्ष तसेच विधिमंडळ पक्षनेत्यांचा समावेश आहे. १७ सप्टेंबरला सायंकाळी सभा होईल.
हा दिवस तेलंगणा राष्ट्रीय सामीलीकरण दिन म्हणून पाळला जातो. तेलंगणामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस जनतेला पाच हमी देणार आहे. त्याबाबतची घोषणा या सभेमध्ये होईल. तेलंगणामध्ये काँग्रेसचा सामना सत्तारूढ भारत राष्ट्र समितीशी आहे. या बैठकीत तेलंगणाबरोबरच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ तसेच मिझोरमच्या निवडणुकीबाबतही चर्चा होईल असे सूत्रांनी सांगितले. विरोधी इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा मुद्दाही चर्चेसाठी येईल. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी भ्रष्टाचार, महागाई, अदानी हे मुद्दे काँग्रेस उपस्थित करण्याची शक्यता आहे.
सरकारला जनता धडा शिकवेल -खरगे
नवी दिल्ली : देशातील महागाईने २० टक्के जनतेचे दैनंदिन जीवन असह्य झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्यांना भेडसावणाऱ्या मुद्दय़ावरून लक्ष वळवू नये असे आवाहन खरगे यांनी केले. सरकारने जनतेची लूट चालवली आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्षांनी समाजमाध्यमावरून केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता भाजपला जागा दाखवेल असा इशारा त्यांनी दिला आहे. महागाई कशी वाढली आहे हे स्पष्ट करताना खरगे यांनी काही वस्तूंची यादीच समाजमाध्यमांवर दिली आहे.