काँग्रेसचे माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या गाडीला राजस्थानच्या अलवर येथे अपघात झाला आहे. या भीषण अपघातात त्यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला तर स्वतः मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. ५९ वर्षीय मानवेंद्र सिंह हे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे सुपुत्र आहेत. सिंह कुटुंबिय दिल्ली-मुंबई महामार्गावरून दिल्लीहून जयपूरला जात असताना अलवर येथे हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर सिंह कुटुंबियांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. पण त्याआधीच चित्रा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार मानवेंद्र सिंह स्वतः गाडी चालवत होते. तर त्यांच्या बाजूच्या सीटवर पत्नी चित्रा बसल्या होत्या. मानवेंद्र यांचा मुलगा आणि त्यांचा चालक मागच्या सीटवर बसले होते. ज्याठिकाणी अपघात झाला, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळत आहे. अलवरचे पोलीस उपअधीक्षक तेजपाल सिंह यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पॉईंट ८२.८ याठिकाणी हा अपघात झाला. चालकासह गाडीत चार लोक होते. मानवेंद्र यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.”
अपघातानंतर मानवेंद्र सिंह यांच्या गाडीचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला असल्याचे दिसत आहे.
कोण आहेत मानवेंद्र सिंह?
मानवेंद्र सिंह हे २००४ ते २००९ या काळात लोकसभेचे सदस्य होते. बाडमेर-जैसलमेर या मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. मानवेंद्र सिंह यांचे वडील जसवंत सिंह हे भाजपातील मोठे नेते होते. भाजपाच्या स्थापनेपासून त्यांचा पक्षात वावर होता. २०२० साली जसवंत सिंह यांचा मृत्यू झाला. एनडीए सरकारच्या काळात जसवंत सिंह यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषविले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात अखेरचे दोन वर्ष त्यांनी अर्थखात्याचा पदभार सांभाळला होता.
या अपघातानंतर सिंह कुटुंबियांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, चित्रा सिंह यांना रुग्णालयात आणले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. मानवेंद्र सिंह यांच्या छातीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते शुद्धीवर आहेत. तसेच त्यांच्या मुलाला थोडी दुखापत झाली आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या अपघातानंतर एक्स वर पोस्ट टाकून चित्रा सिंह यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.