Israel – Palestine News in Marathi: गेल्या दोन दिवसांपासून इस्रायल व हमास यांच्यात घमासान युद्ध सुरू आहे. शनिवारी सकाळी हमासनं शेकडो रॉकेट्स गाझा पट्टीतून इस्रायलच्या भूमीवर डागली. यापाठोपाठ इस्रायलनं युद्धाची घोषणा करत हमासवर कडवा प्रतिहल्ला चढवला. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव गेले असून असंख्य नागरिक जखमी झाले आहेत. हमासचे दहशतवादी इस्रायलच्या भूमीत शिरले असून इस्रायली महिलांचं अपहरण करत आहेत. तर इस्रायलनेही पॅलेस्टाईन नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. या दोन्ही देशांतील युद्धामुळे जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, काँग्रेसने पॅलेस्टाईन नागरिकांच्या समर्थनार्थ पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ठराव मंजूर केला आहे.
काँग्रेस कार्यकारिणी सोमवारी बैठक झाली. “दोन्ही देशांनी तत्काळ युद्धविराम करावा”, असं आवाहन या बैठकीतून करण्यात आलं आहे. तसंच, पॅलेस्टाईनी लोकांच्या जमीन, स्व-शासन आणि आदरपूर्वक जगण्याच्या अधिकारांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसने जाहीर केलं.
काँग्रेसची भूमिका काय?
इस्रायल आणि हमास यांनी तत्काळ युद्धविराम करावा आणि या युद्धाला कारणीभूत असलेल्या मुद्द्यावंर चर्चा सुरू करावी, असं आवाहन काँग्रेसने एका निवेदनाद्वारे केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेताना पॅलेस्टाईन लोकांच्या न्याय्य आकांक्षा संवाद आणि चर्चेद्वारे पूर्ण केल्या पाहिजेत, अशी त्यांच्या पक्षाची धारणा आहे.
आधी केला होता हल्ल्याचा निषेध
दरम्यान, काँग्रेसने याआधी इस्रायलच्या लोकांवरील क्रूर हल्ल्यांचाही निषेध केला होता. त्यांच्या या निषेधानंतर त्यांनी पॅलेस्टाईन नागरिकांसाठीही निवेदन केले आहे.