नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची नऊ मते फुटल्यामुळे सुखविंदर सुक्खू सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपने केला असून सुक्खू सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बंडखोर ६ आमदारांचे भाजपने अपहरण केल्याचा आरोप हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी मंगळवारी राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर केला.
हिमाचल प्रदेश ६८ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी ३५ सदस्यांचे संख्याबळ लागेल. काँग्रेसकडे ४० आमदार असून ३ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. भाजपकडे २५ आमदार आहेत. पण, काँग्रेसच्या ९ आमदारांची मते फुटली असतील तर, काँग्रेसचे संख्याबळ ३१ वर येते. बहुमतापेक्षा संख्याबळ चारने कमी होत असल्याने सुक्खू सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो.
हेही वाचा >>> Rajya Sabha Election : अखिलेश यादवांना धक्का, उत्तर प्रदेशात सपा आमदारांची मतं भाजपाला; पाहा निवडणुकीचा निकाल
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपकडे एकही उमेदवार जिंकून आणण्याएवढे संख्याबळ नसतानाही भाजपने काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवी यांच्यविरोधात हर्ष महाजन यांना रिंगणात उतरवून अटीतटीच्या लढतीचे संकेत दिले होते. सिंघवी यांना ३४ मते मिळाली. बहुमताच्या आकड्यापेक्षा मतांची संख्या एकने कमी असल्याने सुक्खू सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा भाजपने केला आहे.
अयोध्या वारी टाळल्याने ‘सप’मध्ये बंडखोरी?
उत्तर प्रदेशमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळ अयोध्येमध्ये राम मंदिराला भेट देभन रामलल्लाचे दर्शन घेतले होते. पण, या शिष्टमंडळात अखिलेश यादव यांनी सपच्या आमदारांना सहभागी होण्यास मनाई केली होती. ‘सप’च्या बंडखोरीमागे राम मंदिरापासून ‘सप’ची अलिप्तता हे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.