आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर तिहारमध्ये तुमचं स्वागत करेल, असा संदेश तिहारमधील एका आरोपीने अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिला आहे. हा आरोपी दुसरा-तिसरा कुणी नसून कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात तिहारमध्ये असेलला सुकेश चंद्रशेखर आहे. बीआरएसच्या नेत्या के. कविता यांच्या अटकेनंतर तिहारमध्ये तुमचं स्वागत आहे, असंही त्याने एका पत्राद्वारे म्हटलं होत. आज दिल्ली न्यायालयात घेऊन जाताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुकेशने, हे उत्तर दिलं.

सुकेश चंद्रशेखर काय म्हणाला?

न्यायालयात घेऊन जाताना सुकेशला प्रश्न विचारण्यात आला की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. यावर तुझी प्रतिक्रिया काय? या प्रश्नावर उत्तर देत असताना तो म्हणाला, “सत्याचा विजय झाला आहे. मी त्यांचे (केजरीवाल) तिहार तुरुंगात स्वागत करतो. तसेच मी त्यांचा पर्दाफाश करणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मी सरकारच्या बाजूने साक्ष देत आहे.”

“अरविंद केजारीवालांच्या विरोधात सर्व पुरावे देण्यात आले आहेत आणि ते सर्व पुरावे वापरले जातील, याची मी खात्री करून घेतली आहे”, या शब्दात सुकेशने अरविंद केजारीवालांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, बीआरएस नेत्यांना अटक झाल्यामुळे आता दिल्ली मद्द्य घोटाळ्यातील सर्व सहकारी उघडे पडतील आणि भ्रष्टाचाराचा सूत्रधार कोण हेही सर्वांसमोर येईल असा इशाराही सुकेशने याआधी दिलेला होता.

के. कविता यांच्या अटकेनंतर सुकेशने काय म्हटले होते?

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता यांना तेलंगणात अटक केल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. के. कविता तुरुंगात आल्यानंतर सुकेश चंद्रशेखरने एक पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात सुकेशने के. कविता यांना उद्देशून लिहिले की, “अक्का, तिहारमध्ये तुमचे स्वागत आहे. अखेर सत्याचा विजय झाला. राजकीय जादूटोणा, खोटे खटले, खोटे आरोप हे सारे नाटक अखेर फसले आहे. तुम्हाला वाटले की, तुम्ही कधीच पराभत होऊ शकत नाही. तुम्हाला कोणी पकडू शकत नाही. पण तुम्हाला नव्या भारताची ताकद माहीत नाही. आता कायदा पूर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली आणि बळकट झाला आहे. कायद्याच्या तावडीतून तुम्ही सुटू शकत नाही.”

सुकेश चंद्रशेखर कोण आहे?

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांत अनेक खुलासे होत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी सुकेशचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं. त्याने महागडे गिफ्ट देऊन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह नोरा फतेहीचा समावेश असल्याची चर्चा आहे.

Story img Loader