साहित्य संमेलन केवळ ललित साहित्यापुरते मर्यादित असू नये, तर जीवनाच्या वेगवेगळ्या आयामांना या संमेलनाने स्पर्श केला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात दिला. तसेच राज्यात दीडशे संमेलने होतात. आता राजकारण्यांचेच संमेलन व्हायचे बाकी राहिले आहे. मात्र राजकारण्यांचे संमेलन भरवू नये आणि संमेलनामध्ये राजकारण आणू नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत केंद्रीय पातळीवर उत्साह आहे. राज्य सरकारदेखील त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. भाषेला अभिजात दर्जा मिळेलही, पण दहा कोटी लोकांची ही भाषा आपण जपली पाहिजे. भाषेचा विकास करण्यासाठी मराठी ही आधुनिकतेशी जोडून घेतली जावी. डिजिटायझेशनच्या जमान्यामध्ये मानवी संवेदना जपून ठेवण्याचे सामथ्र्य आपल्या साहित्यामध्ये आहे. त्यादृष्टीने साहित्यनिर्मिती झाली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते काश्मिरी कवी रेहमान राही, ‘नया जमाना’चे संपादक जितदर पन्नू, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल (निवृत्त) जे. जे. सिंग, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, स्वागताध्यक्ष भारत देसडला, सरहद संस्थेचे संजय नहार या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते साडेसातशे वर्षांचे आहे. या परंपरेचा पाया संत नामदेवांनी जेथे घातला त्या घुमानमध्ये संमेलन व्हावे आणि संत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे त्याचे अध्यक्ष असावेत ही आनंदाची बाब आहे. भविष्यातील महाराष्ट्राचा द्रष्टेपणाने वेध घेण्याची दृष्टी मोरे यांच्याकडे आहे. साहित्याने माणसांमध्ये पूल उभारला जातो आणि संस्कृतीबरोबरच नाते निर्माण होते. हे नाते या संमेलनाने उजळले आहे आणि लख्ख झाले आहे. अन्य राज्यांमध्येही लिटररी फेस्टिव्हल होत आहेत, मात्र त्यापेक्षाही आपले साहित्य संमेलन वेगळे आणि आशयगर्भ आहे. राज्यामध्ये वेगवेगळी दीडशे संमेलने होतात. आता केवळ राजकारण्यांचेच संमेलन व्हायचे बाकी राहिले आहे, मात्र राजकारण्यांचे संमेलन भरवू नये आणि संमेलनामध्ये राजकारण आणू नये. साहित्य संमेलन हे केवळ ललित साहित्यापुरते मर्यादित असू नये, तर जीवनाच्या वेगवेगळ्या आयामांना या संमेलनाने स्पर्श केला पाहिजे.’
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याचे कारण शेतकऱ्यांमधील ऊर्जा जागृत करणारा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. भविष्यातील साहित्यनिर्मितीमध्ये भक्तिमार्गाचा आधार घेत संकटाशी सामना करण्याची शक्ती जागृत करावी लागेल, असेही फडणवीस म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा