Manipur : गेल्या जवळपास वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरु आहेत. हिंसाचाराच्या घटनेत अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र, तरीही हिंसाचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. यातच आता पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचार उसाळला असून परिस्थिती चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील उद्या तातडीने बैठक बोलावली असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाला मणिपूरमध्ये एक मोठा धक्का बसला आहे. मणिपूरमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि भाजपाची युती संपुष्टात आली आहे.
नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीने राज्यातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पक्षाचे प्रमुख कॉनराड संगमा यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच सरकार सध्याची परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर असमाधानी असून निष्पाप लोकांचं नुकसान झाल्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा कॉनराड संगमा यांनी केली आहे. तर एनपीपीचे मणिपूर विधानसभेत सात आमदार आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
हेही वाचा : Crime News : घरात चिकन बनवण्याचा आग्रह, आई आणि भावांनी गळाच आवळला; पोलिसांना कसा लागला खुनाचा छडा?
पत्रात काय लिहिलं?
एनपीपीने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “आम्हाला ठामपणे वाटतं की बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मणिपूर राज्य सरकार संकटाचे निराकरण करण्यात आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यात अपयशी ठरलं आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर राज्यातील बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा तात्काळ काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. “
NPP (National People's Party) withdraws its support to the N. Biren Singh-led Government in Manipur with immediate effect. pic.twitter.com/iJ8VpPxWD2
— ANI (@ANI) November 17, 2024
दरम्यान, मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून मे महिन्यापासून येथे मेईतेई आणि कुकी समाजातील लोकांमध्ये संघर्ष सुरू आहे. आता पुन्हा एकदा या संघर्षाने हिंसक स्वरूप धारण केलं आहे. तीन मुले आणि तीन महिलांचा मृत्यू झाल्यानंतर येथे सातत्याने निदर्शने सुरू आहेत.
Amit Shah reviews security situation in Manipur amid ongoing tensions
— ANI Digital (@ani_digital) November 17, 2024
Read @ANI Story | https://t.co/m8drPDBEkC#AmitShah #Manipur pic.twitter.com/Br6dLtdQ7S
बिरेन सिंग यांचं सरकार कोळणार का?
एनपीपीने भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडणं हा भाजपासाठी मोठा धक्का आहे. मात्र, राज्यात भाजपाचेच सरकार कायम राहणार आहे. कारण मणिपूर विधानसभेत भाजपाकडे बहुमत आहे. त्यामुळे एनपीपीने जरी पाठिंबा काढला तरी सरकारला कोणताही धोका नाही. तसेच जनता दल (संयुक्त) च्या पाच आमदारांचाही भाजपाला पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारला कोणताही धोका सध्या तरी नसल्याचं बोललं जात आहे.