Maha Kumbh Mela Stampade : उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने प्रयागराज महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीच्या तपासाचा वेग वाढवला आहे. उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक या घटनेमागे काही कट होता का या दृष्टीकोनातून तपास करत आहे. महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमागे काही कट कारस्थान होता का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासाचा एक भाग म्हणून, यूपी एसटीएफ संगम नाक्याभोवती सक्रिय असलेल्या १६ हजार मोबाइल क्रमांकांच्या डेटाची तपासणी करत आहे. चौकशीत असे दिसून आले आहे की, यापैकी बरेच क्रमांक सध्या बंद आहेत.
घटनेपासून अनेक मोबाइल नंबर्स बंद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ हजारांहून अधिक मोबाईल क्रमांकांच्या डेटाचे विश्लेषण केले जात आहे. आतापर्यंतच्या तपासात, घटनेपासून अनेक मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले आहे. महाकुंभमेळा परिसरात बांधलेल्या कमांड अँड कंट्रोल रूमच्या सीसीटीव्हीवरून फेस रेकग्निशन अॅपद्वारे संशयितांची ओळख पटवली जात आहे. वसंत पंचमी स्नानाबाबत उत्तर प्रदेश पोलीस हाय अलर्टवर आहेत. दरम्यान, वसंत पंचमीनिमित्त सोमवारी सकाळी होणाऱ्या तिसऱ्या अमृत स्नानापूर्वी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौथे महास्नान १२ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेला होणार आहे, तर शेवटचे स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणार आहे.
तिसरे अमृत स्नान सोमवारी
वसंत पंचमीनिमित्त महाकुंभात होणारे तिसरे अमृत स्नान सोमवारी पहाटे ५ वाजता सुरू होईल. सर्वप्रथम पहाटे ४ वाजता, पंचायत आखाडा अमृत स्नानासाठी संगम घाटावर पोहोचेल. यानंतर, एक-एक करून इतर १२ आखाडे देखील संगमात स्नान करतील. मौनी अमावस्येच्या दिवशी, २९ ते ३० जानेवारी दरम्यान रात्री २ वाजताच्या सुमारास, प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरी झाली होती. घटनेच्या सुमारे १६ तासांनंतर, महाकुंभ प्रशासनाने ३० भाविकांचा मृत्यू आणि ६० जण जखमी झाल्याची माहिती दिली होती.
भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना
२९-३० जानेवारीच्या मध्यरात्री महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, उत्तर प्रदेश सरकारने गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. याअंतर्गत, मुख्य स्नान महोत्सवाच्या एक दिवस आधी आणि एक दिवस नंतर शहरात वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे, सर्व व्हीआयपी पास रद्द करण्यात आले आहेत. महाकुंभमेळ्याला शहराशी जोडणारे सर्व ४० पोंटून पूल उघडण्यात आले आहेत. यापूर्वी, वैध पास असलेल्या वाहनांना महाकुंभमेळा परिसरात उभारलेल्या विविध शिबिरांमध्ये जाण्याची परवानगी होती. व्हीआयपी पास असलेल्यांना विविध क्षेत्रातील आखाडे आणि साधूंच्या तंबूंना भेट देण्याची परवानगी होती.