आपल्या मुलाने यशस्वी व्हावे, नाव कमवावे अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते. कारकीर्दीत मुलाच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळणे हा प्रत्येक पित्यासाठी एक अभिमानाचा क्षण असतो. पण अशी संधी अपवादानेच मिळते. उत्तर प्रदेशातील जर्नादन सिंह अशाच नशिबवान पित्यांपैकी एक आहेत. जनार्दन उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल आहेत. त्यांचा मुलगा अनूप कुमार सिंह यांची नुकतीच लखनऊ उत्तरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
जनार्दन सध्या लखनऊच्या गोमती नगरमधील विभूती खांड पोलीस स्टेशनमध्ये डयुटी करतात. हे पोलीस स्टेशन त्यांचा मुलगा अनूप कुमारच्या नियंत्रणाखाली आहे. माझा मुलगा माझा वरिष्ठ आहे याचा मला अभिमान वाटतो. हा माझा सन्मान आहे. त्याच्या हाताखाली काम करणे हा एक आनंददायी अनुभव आहे असे जनार्दन यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
एसपी अनूप कुमार यांनी व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे असल्याचे सांगितले. आम्ही ज्या पदावर आहोत त्यानुसार काम करु असे त्यांनी सांगितले. तेलंगणमध्ये सुद्धा पिता आणि मुलीची अशीच एक जोडी आहे. ए.आर.उमामहेश्वरा सरमा यांना आपल्या मुलीला सलाम ठोकताना अभिमान वाटतो. त्यांची मुलगी सिंधू सरमा जगतियाल जिल्ह्यात पोलीस अधीक्षक आहेत. रविवारी टीआरएसच्या एका सभेच्यावेळी हे पिता पुत्री समोरासमोर आले होते.