जेएनयूतील कोणताही विद्यार्थी देशविरोधी नाही. पंतप्रधानांशी वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. आम्ही दहशतवादी नाही. आम्ही तुमच्या मुलांसारखेच आहोत, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार म्हणाला. दिल्ली उच्च न्यायालायने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर कन्हैया कुमार याने शुक्रवारी विद्यापीठाच्या परिसरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलत असताना त्याने पंतप्रधानांशी वैयक्तिक मतभेत नसल्याचे सांगितले.
विद्यापीठात ९ फेब्रुवारी रोजी घडलेल्या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. तो देशद्रोह होता की नाही न्यायालयाला ठरवू द्या. आमचा देशाच्या संविधानावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे, असे मत कन्हैय्याने यावेळी व्यक्त केले. याशिवाय, मी राजकारणी नसून विद्यार्थी आहोत पण देशात दलितांवर अन्याय, हक्कांवर गदा आणि रोहित वेमुलासारखी प्रकरणे घडत असतील तर त्याविरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असेही तो पुढे म्हणाला.
अफझल गुरू देशाचा नागरिक
अफझल गुरू हा स्वतंत्र भारताचा नागरिक होता. त्याने देशविरोधी कृत्य केले आणि संविधानाने त्याला शिक्षा दिली. त्यामुळे अफझल गुरू हा माझा आदर्श नसून रोहित वेमुला हा माझा आदर्श आहे, असे कन्हैयाने सांगितले. रोहिम वेमुलाचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. काही लोकांच दबावाचं राजकारण मोडून काढायचं आहे, असेही तो म्हणाला.
सर्व आरोप चुकीचे
संविधान हा काही व्हिडिओ नाही की ज्यात फेरफार करता येईल, असा टोला लगावत कन्हैयाने आपल्याविरोधातील देशद्रोहाचा आरोप फेटाळून लावला. याशिवाय, अटकेत असलेल्या आपल्या दोन सहकऱयांवरील आरोप धादांत खोटे असल्याचा दावा त्याने केला. दहशतवादी असल्यासारखी आमची प्रतिमा तयार केली गेली. दलित आणि शेतकऱयांसाठी लढणं हा जर अपराध असेल तर होय मी अपराधी आहे, असेही तो पुढे म्हणाला.