रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बांधण्यात येत असलेल्या अयोध्येतील मशिदीचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टचे सचिव अतहर हुसेन यांनी दिली आहे. तसेच अयोध्या विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित मशिदीच्या नकाशाला लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात मुस्लिमांना प्रवेश बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी
“आम्हाला अपेक्षा आहे की, या महिन्याच्या अखेरीस अयोध्या विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित मशीद, हॉस्पिटल, कम्युनिटी किचन, लायब्ररी आणि संशोधन केंद्राच्या नकाशाला मंजुरी मिळेल. त्यानंतर लगेच आम्ही मशिदीचे बांधकाम सुरू करू. हे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यत पूर्ण होईल, असा आम्हाला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया अतहर हुसेन यांनी दिली आहे. तसेच त्यासाठी निधी उभारण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा – Video: गुजरातमध्ये ओवैसींच्या सभेत मोदी-मोदीच्या घोषणा, श्रोत्यांनी दाखवले काळे झेंडे
दरम्यान, रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यादरम्यान निर्णय देताना वादग्रस्त २.७७ एकर जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.