Allahabad High Court: मद्यपान हे सुखी संसाराला लागलेलं ग्रहण आहे, असं म्हणतात. पतीच्या मद्यपानामुळं अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. पण पत्नीच मद्यपान करत असेल तर? असंच एक प्रकरण सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले असता न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली. आपली पत्नी मद्यपान करते, म्हणून आपल्याला घटस्फोट देण्यात यावा, अशी मागणी एका पतीनं केली होती. मात्र न्यायालयानं सांगितलं की, जोपर्यंत पत्नी मद्याच्या नशेत अभद्र किंवा अनुचित व्यवहार करत नाही, तोपर्यंत फक्त मद्य पिणे ही क्रूरता ठरत नाही. मात्र पती-पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत असल्यामुळे न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मान्य केला.
पतीनं न्यायालयात दावा केला की, त्याची पत्नी त्याला न कळवता तिच्या मित्रांसह बाहेर जाते आणि मद्यपान करते. पतीच्या दाव्यानंतर न्यायालयाने म्हटलं की, मद्यपान करणं, ही क्रूरता नाही. जर पत्नी मद्यपानानंतर असभ्य व्यवहार करत नसेल तर त्याला क्रूरता म्हणता येणार नाही. मद्यपानानंतर पत्नी काही चुकीची वागली, असा कोणताही पुरावा पतीकडून देण्यात आलेला नाही.
याचिकाकर्ता पतीनं पत्नीविरोधात क्रूरता आणि त्याला सोडून जाण्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती. न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायामूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटलं की, क्रूरता आणि परित्याग हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. न्यायालयाने पुढे म्हटले की, मद्यपान करणे ही क्रूरता आहे किंवा मद्यपानामुळे जोडप्याच्या मुलामध्ये जन्मतः काही दोष आहे, याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.
न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, पत्नीला आलेले फोन तिच्या पुरुष मित्रांचेच होते आणि त्यातून पतीला काही क्रूरतेची वागणूक मिळाली, याचाही पुरावा समोर आलेला नाही. तसेच पत्नी आणि पती २०१६ पासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यानूसार हा एकप्रकारे परित्याग आहे. तसेच पतीने दाखल केलेल्या याचिकेतही पत्नीने सहभाग घेतला नाही. याचा अर्थ तिलाही सासरी परतण्यामध्ये काही रस नसल्याचे दिसते, असे सांगून न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.
या जोडप्याचं २०१५ मध्ये लग्न झालं होतं. विवाह नोंदणीच्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं. २०१६ मध्ये त्यांना एक मुलगाही झाला. पण त्यानंतर पत्नीने घर सोडले आणि ती कोलकाता येथे राहायला गेली. तेव्हापासून पती आणि पत्नी विभक्त आहेत.