महाराष्ट्रातून जागतिक पटलावर आपल्या कुंचल्यांची अमिट छाप सोडणारे प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर पाचपुते यांना इंग्लंडमधल्या प्रतिष्ठेच्या आर्ट्स मंडी ९ पुरस्करानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामुळे भारतासोबतच विशेष करून महाराष्ट्राच्या शिरपेचाच मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. ‘आर्ट्स मंडी’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाविष्कारांना सन्मानित करणाऱ्या संस्थेकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार इतर ५ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांसोबत प्रभाकर पाचपुतेंना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पाचपुते यांनी काढलेल्या ‘पोलिटिकल अॅनिमल’ या चित्रमालिकेतील चित्रांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
“हा माझा सन्मान”
“परीक्षकांनी मलाही हा पुरस्कार देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी त्याचा मनापासून आदर करतो. सर्व ६ चित्रकारांची पुरस्कारासाठी निवड करण्याचा उत्तम निर्णय परीक्षकांनी घेतला आहे. सध्याच्या कठीण काळामध्ये परीक्षकांनी हा योग्य निर्णय घेतला आहे. अशा उत्तम चित्रकारांसोबत हा पुरस्कार स्वीकारणं हा माझा सन्मानच आहे”, अशी प्रतिक्रिया प्रभाकर पाचपुते यांनी दिली आहे.
पुरस्काराची रक्कम १३ हजार ९०० डॉलर!
‘आर्ट्स मंडी’ या संस्थेकडून २००२ सालापासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याचं विद्यमान स्वरूप ४० हजार पौंड अर्थात साधारणपणे ५ हजार ६२० डॉलर इतकं आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच हा पुरस्कार ६ आंतरराष्ट्रीय चित्रकारांना विभागून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक विजेत्या चित्रकाराला १३ हजार ९०० डॉलर इतकी पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. या पुरस्कारासाठी तब्बल ६० देशांमधून ५०० चित्रकारांनी आपापल्या कला पाठवल्या होत्या. त्यातून या ६ चित्रकारांची निवड करण्यात आली होती.
प्रभाकर पाचपुतेंच्या कलेला मिळाली पोचपावती!
मूळचे पुण्याचे असलेले प्रभाकर पाचपुते यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या चित्रांना जगभर प्रसिद्धी देणाऱ्या कलकत्त्यातील एक्स्परिमेंटर गॅलरीकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. “प्रभाकर पाचपुते हे भारतीय उपखंडाचा फार महत्त्वाचा आवाज आहेत. हा पुरस्कार ही त्याच आवाजाला मिळालेली पोचपावती आहे. आपल्याला सामाजिक, राजकीय दृष्ट्या आणि पर्यावरणीय दृष्टी सामना कराव्या लागणाऱ्या समस्या ते त्यांच्या चित्रांमधून मांडत आले आहेत. यातून ते फार गंभीर प्रश्न समाजासमोर उपस्थित करतात”, अशी प्रतिक्रिया एक्स्परिमेंटरकडून व्यक्त करण्यात आली आहे.