भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक मतदारसंघांमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींमध्ये लढत असल्याचे चित्र आहे. सत्तारूढ भाजप तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे.
नर्मदापूरम मतदारसंघात विधानसभेचे माजी अध्यक्ष सीताराम शर्मा हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात त्यांचेच बंधू गिरिजाशंकर हे काँग्रेसकडून रिंगणात आहेत. गिरिजाशंकर हे भाजपचे माजी आमदार असून, उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सागर मतदारसंघात काँग्रेसच्या निधी सुनील जैन यांचा सामना भाजपच्या शैलेंद्र जैन यांच्याशी आहे. हे दोघेही नातेवाईक आहेत. रिवा जिल्ह्यातील देओतलाब मतदारसंघात काँग्रेसने पदमेश गौतम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे मामा व विधानसभा अध्यक्ष गिरीश पदमेश हे भाजपकडून उमेदवार आहेत. हर्दा जिल्ह्यात तिमरनी येथे भाजपचे आमदार संजय शहा यांच्याविरोधात काँग्रेसकडून त्यांचा पुतण्या अभिजीत रिंगणात आहे.
हेही वाचा >>> मध्य प्रदेशमध्ये नेत्यांच्या राजीनामा अस्त्रामुळे भाजपा आणि काँग्रेस हैराण; तिकीट नाकारल्यामुळे नाराजी
ग्वाल्हेर जिल्ह्यातील दब्रा मतदारसंघात माजी मंत्री भाजपच्या इमरती देवी यांचा सामना काँग्रेसचे आमदार सुरेश राजे यांच्याशी आहे. हे दोघेही नातेवाईक आहेत. पक्ष कार्यकर्ता हे भाजपचे कुटुंब आहे. योग्य कार्यकर्त्यांला उमेदवारी देण्याबाबत पक्षाने निर्णय घेतल्याचे भाजप प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले. तर हा केवळ योगायोग आहे असे काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख के.के.मिश्रा यांनी स्पष्ट केले.
विविध विचारांच्या व्यक्ती एका कुटुंबात राहू शकतात असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ता आणि पदासाठी हे सुरू आहे मत राजकीय विश्लेषक आनंद पांडे यांनी या लढतींबाबत व्यक्त केले.
देश तोडू पाहणाऱ्यांच्या विरोधात लढा -तोमर
पीटीआय, ग्वाल्हेरदेश तसेच धर्म तोडू पाहणाऱ्या शक्तींविरोधात भाजपचा लढा सुरू आहे असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी व्यक्त केले.पक्षाच्या माध्यम कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मोरेना जिल्ह्यातील दिमनी मतदारसंघातून तोमर निवडणूक लढवत आहेत. आमचा लढा हा केवळ काँग्रेसशी नाही, तर जे देश तसेच सनातन धर्म तोडू पाहात आहेत त्यांच्याविरोधात आम्ही आहोत असे तोमर यांनी नमूद केले. मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ असत्याच्या आधारावर काँग्रेस निवडणुकीला सामोरी जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिग्विजयसिंह यांच्या टीकेला चौहान यांचे प्रत्युत्तर
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कन्यापूजनावरून काँग्रेस नेते दग्विजय सिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे. दिग्विजय यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यावर कन्यापूजन हे नाटक असल्याची टीका केली होती. त्यावर शिवराज यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेस नेतृत्वाने याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. कन्यापूजन हा सनातन संस्कार आहे. चौहान यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी सोमवारी कन्यापूजन केले होते. त्यावर दिग्विजयसिंह यांनी टीका केली होती. निर्मळ मनाचा व्यक्तीच हे करू शकतो. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच सोनिया गांधी यांनी कन्यापूजन हे नाटक आहे काय? हे जाहीर करावे अशी मागणी चौहान यांनी केली. तुम्ही कन्यापूजनाला विरोध करून दिग्विजयसिंह यांनी खालची पातळी गाठली आहे असे टीकास्त्र चौहान यांनी सोडले आहे.