रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्या गैरहजेरीवर आज राज्यसभेत सपा खासदार नरेश अग्रवाल यांनी चांगलाच हंगामा केला. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना जर राज्यसभेत यायचं नाही तर त्यांनी सरळ खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मला हा मुद्दा वारंवार उचलावा लागतो आहे असं म्हणत त्यांनी आज पु्न्हा एकदा सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या अनुपस्थितीवर त्यांनी बोट ठेवलं. या दोघांकडे जाहिराती करायला वेळ आहे इतर ठिकाणी जायला वेळ आहे, मग राज्यसभेत यायला वेळ का नाही? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

कला आणि क्रीडा या विभागातून नामवंत व्यक्तींना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवलं जातं मात्र रेखा आणि सचिन तेंडुलकर यांनी मागील तिन्ही अधिवेशनात हजेरी लावली नाही. ते राज्यसभेत आले आहेत अशी वेळ अत्यंत कमीवेळा आली आहे. खासदार म्हणून या दोघांनाही राज्यसभेवर येण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी सरळ खासदारकी सोडावी आणि घरी जावं, मात्र राज्यसभेची खासदारकी घ्यायची आणि तिथले नियम पाळायचे नाहीत याला काय अर्थ आहे? असा सवालही नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.

हिवाळी अधिवेशान हे दोघे एकदा राज्यसभेत आले अर्थसंकल्प अधिवेशनात एकदा हजेरी लावली, तर आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ते एकदाही आलेले नाहीत. जाहिराती करण्यासाठी या दोघांकडे वेळ आहे मात्र राज्यसभेत यायला वेळ नाही. त्यांना या अधिवेशनात आणि लोकांच्या प्रश्नात काहीही स्वारस्य नाही हेच त्यांची गैरहजेरी दाखवून देते आहे. याआधी देखील हा मुद्दा वारंवार मांडला गेला आहे मात्र त्यांना कोणीही सदनात येण्याबाबत खडसावत नाही. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना लोकांच्या प्रश्नांशी घेणंदेणं नाहीये त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी नरेश अग्रवाल यांनी केली आहे.

नरेश अग्रवाल यांच्या विचारणेनंतर, या दोघांना सुट्टी दिली आहे असं उत्तर राज्यसभेचे उपसभापती जे. पी. कुरियन यांनी दिलं आहे. मात्र तुम्ही त्यांना गैरहजेरीबाबत ताकीद दिलीच पाहिजे अशी आग्रही मागणी अग्रवाल यांनी केली, त्यानंतर त्यांना ताकीद दिली जाईल असं कुरियन यांनी म्हटलं आहे.

Story img Loader