आधी लोकसंख्या आटोक्यात आणा ! रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन
रेल्वेसमोर असंख्य समस्या आहेत. पण त्या सोडविण्यापूर्वी आधी लोकसंख्या आटोक्यात आली पाहिजे.. हे मत आहे खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे. वर्षभरात रेल्वे विकासकामाच्या गतीवर समाधानी असलेल्या सुरेश प्रभू यांनी रेल्वेत होणाऱ्या गैरसोयींसाठी अप्रत्यक्षपणे अवाढव्य लोकसंख्येलाच जबाबदार धरले. रेल्वे स्थानक परिसरात होणारी अतिप्रचंड गर्दी, अतिक्रमण आदी समस्यांवर लोकसंख्या वाढ रोखणे हा एक उपाय असल्याचे प्रभू गमतीने म्हणाले खरे परंतु त्यामुळे रेल्वेच्या मर्यादाच स्पष्ट झाल्या. देशभरात मोठय़ा प्रमाणात रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण आहे. मात्र जमीन हा राज्यांशी संबंधित विषय असल्याने हे अतिक्रमण काढण्यात राज्यांची मदत महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रात रेल्वेच्या जागेत असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी सर्वतोपरी साह्य़ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे प्रभू म्हणाले. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम येत्या ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या समस्या सुटण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील रेल्वे प्रश्न सुटण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील रेल्वेच्या विकासकामांना गती येईल. नक्षलग्रस्त भागात रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी ४७० कोटी रुपयांचा प्रकल्प आखण्यात आला असल्याचे प्रभू यांनी यावेळी सांगितले.
* रेल्वे स्थानक परिसरात होणारी अतिप्रचंड गर्दी, अतिक्रमण आदी समस्यांवर लोकसंख्या वाढ रोखणे हा एक उपाय आहे.